स्वच्छता अमृत महोत्सवात इंडियन स्वच्छता लीगमध्ये नवी मुंबईकर युवक 17 सप्टेंबरला करणार स्वच्छतेचा जागर
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी व्यापक लोकसहभागातून स्वच्छता विषयक अभिनव उपक्रम आयोजित केले जात असून सेक्टर 26 नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागाने “नवी मुंबई इको क्नाईट्स” हा अभिनव उपक्रम संपन्न होत आहे.
त्याचप्रमाणे पामबीच मार्गावर 7500 मीटर मानवी साखळीव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव आणि खारपुटी परिसराची स्वच्छता तसेच मिनी सी शोअर वाशी येथे तृतीयपंथीय नागरिकांकडून परिसर स्वच्छता असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना “इंडियन स्वच्छता लीग” हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून त्यामध्ये देशातील 1800 हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. या अनुषंगाने 17 सप्टेंबर रोजीचा सेवा दिवस ते 2 ऑक्टोबर रोजीचा स्वच्छता दिवस या पंधरवड्यात स्वच्छता विषयक नानाविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत असून स्वच्छता कार्यात तरूणाईचा सहभाग सर्वाधिक महत्वाचा असणार आहे. यादृष्टीने कचरा विरोधात युवक (#Youth V/s Garbage) ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली असून या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे व या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे.
त्यानुसार “नवी मुंबई इको क्नाईट्स” या नावाने समस्त नवी मुंबईकर नागरिकांचा संघ जाहीर करण्यात येत असून या संघाचे वैशिष्ट्यपूर्ण बोधचिन्ह तयार करण्यात आलेले आहे. या बोधचिन्हामध्ये नवी मुंबईची इको सिटी म्हणून ओळख दृढ करणा-या फ्लेमिंगो पक्षाच्या रेखाकृती चितारण्यात आल्या असून आयकॉनिक वास्तू म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेचे रेखाटन या लोगोमध्ये समाविष्ट आहे. ही अस्वच्छतेविरोधातील लढाई लढणारे योध्दे म्हणून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पोर्टलवरील लिंकवर (https:/innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) आपली नोंदणी करून या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले.
17 सप्टेंबर रोजी सेक्टर 26, नेरुळ येथील भव्यतम गणपतशेठ तांडेल मैदानात सकाळी 8 ते 11 या वेळेत संपन्न होणा-या “इंडियन स्वच्छता लीग”च्या विशेष कार्यक्रमात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून इतर युवकांनीही याप्रसंगी स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहून राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले.
याप्रसंगी महानगरपालिका क्षेत्रातील 250 हून अधिक शाळांचे विद्यार्थी सहभागी होत असून यानिमित्त शाळा, महाविद्यालये यांची स्वच्छता विषयक स्पर्धाही घेतली जाणार आहे. हे शाळा, महाविद्यालयांचे समुह कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच 3 प्रकारे वर्गीकरण, सिंगल युज प्लास्टिकला प्रतिबंध तसेच स्वच्छता असे 3 विषय वेशभूषा, घोषवाक्ये अथवा इतर कल्पक रितीने प्रदर्शित करतील व त्यामधील वेगळेपणानुसार त्यांचे गुणांकन करून सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणा-या, उपस्थिती दर्शविणा-या व शिस्तीचे पालन करणा-या 3 शाळा, महाविद्यालयांना विशेष पारितोषिके दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले.
“इंडिया वर्सेस गार्बेज” ही केंद्र सरकारमार्फत या लीगसाठी दिलेली टॅगलाईन असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छता विषयक अधिक चांगले काम करीत राहणे हेच आपले उद्दिष्ट असून त्यादृष्टीने “इंडियन स्वच्छता लीग”मध्ये प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून “नवी मुंबई इको क्नाईट्स”चे योध्दे म्हणून आपले स्वच्छतेचे मानांकन उंचाविण्याचे उद्दीष्ट साध्य करूया असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांना केले आहे.
Published on : 13-09-2022 14:42:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update