जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन
ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत 27 विरंगुळा केंद्रांच्या माध्यमांतून त्यांना उत्साहित करेल असे वातावरण उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही देशातील अग्रगण्य महानगरपालिका आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्याप्रमाणेच त्यांच्या अनुभव संपन्नतेचा उपयोग शहर विकासात केला जात आहे.
या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांच्या अंगभूत वैविध्यपूर्ण गुणांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने व या माध्यमातून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 1 ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध मनोरंजात्मक, व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
कोरोना प्रभावित कालावधी नंतर 2 वर्षांनी ज्येष्ठांसाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये, दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी कॅरम स्पर्धा व बुध्दीबळ स्पर्धा कै. सिताराम मास्तर उद्यान सेक्टर 7 सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे सकाळी 9.30 वाजल्यापासून संपन्न होत असून सहभागाकरिता 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत.
समुह नाटिका, एकपात्री अभिनय, वेशभूषा, काव्यवाचन, गायन, कथाकथन या 5 स्पर्धा 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून सेक्टर 12 नेरूळ येथील प्लॉट क्र.7 सी येथील ज्येष्ठ नागरिक भवनात आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धा सहभाग अर्ज 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करावयाचे आहेत.
ब्रिझ गेम स्पर्धा दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील नागा गणा पाटील उद्यानात असलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात संपन्न होत असून प्रवेशाकरिता 26 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत.
याशिवाय 'जीवन सुंदर आहे – जगायला शिकूया !’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 26 सप्टेंबर हा अंतिम दिनांक आहे.
दि. 01 ऑक्टोबर 2019 ते दि. 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांचा त्याचप्रमाणे दि. 01 ऑक्टोबर 2019 ते दि. 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा सन्मान 1 ऑक्टोबरच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या विशेष कार्यक्रमात होणार आहे. त्याकरिता 29 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावयाची आहे.
या स्पर्धा व सन्मान विषयीची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी - शर्ती महानगरपालिकेची सर्व विभाग कार्यालये तसेच उपआयुक्त, समाज विकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी. बेलापूर यांचे कार्यालय या ठिकाणी (शासकीय सुट्ट्या वगळून) आणि महानगरपालिकेमार्फत कार्यान्वित असलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे उपलब्ध आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी बेलापूर व नेरुळ विभागाकरिता श्री. प्रकाश कांबळे – 9969008088, वाशी व तुर्भे विभागाकरिता श्री. सुंदर परदेशी – 9594841666, कोपरखैरणे व घणसोली विभागाकरिता श्री. दादासाहेब भोसले 9372106976, ऐरोली व दिघा विभागाकरिता – श्री. दशरथ गंभीरे 9702309054 यांच्याशी संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणाना वाव देणारा ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठांसाठी एक आनंदोत्सव असतो, यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 19-09-2022 11:38:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update