लोकसेवा हक्क आयोगाचे कोकण विभाग आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्याकडून नमुंमपा लोकसेवांचा आढावा
विहित कालावधीत नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असून त्यामधील अडचणी स्वाधिकारे दूर करून अंमलबजावणीत प्रलंबितता राहू नये याबाबत तत्पर कार्यवाही करण्याचे सूचित करीत राज्य लोकसेवा आयोगाचे कोकण महसूली विभाग आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी सेवा पंधरवडा कालावधीत अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन सेवांबाबतचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत अशा सूचना केल्या.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबविला जात असून या अंतर्गत विशेष प्राधान्याने निकाली काढावयाच्या अधिसूचित सेवांबाबतचा तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी डॉ. किरण जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना 51 लोकसेवा उपलब्ध करून दिल्या जात असून त्यामधील 28 लोकसेवा ऑनलाईन पध्दतीनेही उपलब्ध आहेत ही सकारात्मक बाब असल्याचे नमूद करीत 90 टक्केपेक्षा अधिक सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून दिल्या जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नागरिकांना विविध सेवा पुरविण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे अधोरेखित करीत डॉ. किरण जाधव यांनी कोणताही अर्ज नाकारण्यापूर्वी त्या अर्जदाराला आवश्यक त्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. सेवा पंधरवड्याच्या कालावधीत प्रलंबित अर्ज नागरिकांना सेवा पुरवून निकाली काढावेत अशाही सूचना त्यांनी केल्या.
कोव्हीड काळात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत अतिशय प्रभावी काम झाल्याचा विशेष उल्लेख करीत स्वच्छतेमध्ये नवी मुंबई नेहमीच आघाडीवर असते सेवा पंधरवड्याच्या कालावधीतही प्रलंबित सेवा अर्जांचा निपटारा करण्याचे नवी मुंबईचे काम सर्वोत्तम असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे कोकण महसूली विभाग आयुक्त डॉ. किरण जाधव यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या लोकसेवांबाबतचा सविस्तर अहवाल सादर केला. डॉ. किरण जाधव यांनी ऑनलाईन सेवांची कार्यपध्दती प्रत्यक्ष जाणून घेतली तसेच उपस्थितांशी संवाद साधत सेवा पुरविण्यात येणा-या अडचणीं, सूचना जाणून घेतल्या व शंकानिरसन केले. याप्रसंगी आयोगाचे सहसचिव श्री. मानिक दिवे व इतर अधिकारी तसेच महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख, सेवांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 24-09-2022 14:39:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update