'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात नंबर वन
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ या टॅगलाईननुसार 53 हजाराहून अधिक युवकांच्या सहभागाने सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार भव्यतम उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे लीग अंतर्गत एक लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी 'नवी मुंबई इको क्नाईट्स' संघात नोंदणी केली. तरुणाईच्या या उत्स्फुर्त सहभागाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारच्या वतीने इंडियन स्वच्छता लीगमध्ये राष्ट्रीय स्तरावर 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला.
नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियममध्ये संपन्न झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सवच्या भव्य समारंभात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री श्री कौशल किशोर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सहसचिव तथा स्वच्छ भारत मिशनच्या संचालक श्रीम. रूपा मिश्रा, नगर विकास विभाग उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव श्री. अमृत अभिजीत आणि प्रधान सचिव श्री. निकुंज श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डाॅ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ उपायुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व डाॅ. अमरिश पटनिगीरे यांनी हा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या भव्यतम उपक्रमाची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये झाली असून इंडियन स्वच्छता लीगसाठी सुप्रसिध्द संगीतकार, गायक व नवी मुंबईकर रहिवाशी पद्मश्री श्री. शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ हा संघ जाहीर करण्यात आला होता. त्या अंतर्गत एक लाखाहून अधिक नागरिकांनी रजिस्ट्रेशन करीत सहभाग नोंदविला.
इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालय इमारत ते मोराज सर्कल सानपाडा पर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झळकवत मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला. त्यासही बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सचा बहुमान लाभला. त्याचप्रमाणे यावेळी कांदळवन स्वच्छता मोहीम राबवून तेथून जमा करण्यात आलेला कचरा ६० फूट फ्लेमिंगो रेखाकृतीच्या आत जमा करून पर्यावरणशील दृष्टीकोन जपत फ्लेमिंगो सिटी ही नवी मुंबईची ओळख अधोरेखीत करण्यात आली.
अशाचप्रकारे सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर, वाशी याठिकाणी 207 तृतीयपंथी नागरिकांनी ‘स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग’ असा संदेश प्रसारित करत परिसर स्वच्छता केली व जनजागृती रॅली काढली. याचीही विशेष दखल बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स यांनी घेतली.
त्याचप्रमाणे पारसिक हिल, सीबीडी, बेलापूर येथे युवकांनी एकत्र येत ओला, सुका व घरगुती घातक कच-याच्या वर्गीकरणाचे महत्व निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाच्या छत्र्या प्रदर्शित करून आगळ्यावेगळ्या प्रकारे प्रदर्शित केले तसेच परिसराची स्वच्छताही केली.
स्वच्छतेमध्ये नेहमीच देशामध्ये आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेला इंडियन स्वच्छता लीगमध्येही सर्वाधिक युवक सहभागाचा १० लाख लोकसंख्येवरील देशातील मोठ्या शहरात प्रथम क्रमांकाच्या शहराचा राष्ट्रीय बहुमान लाभला असून हा नवी मुंबईतील युवाशक्तीचा सन्मान आहे.
Published on : 30-09-2022 14:53:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update