नागरिकांना सर्वोत्तम शहरात राहतोय याचा आनंद देण्यासाठी शहर सुशोभिकरणावर भर देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
नवी मुंबई शहर स्वच्छतेवर बारकाईने लक्ष देतानाच सुशोभिकरणावरही व्यापक स्वरुपात भर दिला तर नागरिकांना आपण सर्वोत्तम शहरात राहतो याचा आनंद वाटतो आणि हेच शहर सुशोभिकरणामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी “स्वच्छ सर्वेक्षण 2023” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित विशेष बैठकीप्रसंगी आयुक्तांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच उंचाविणारी कामगिरी केली असून राज्यातील इतर शहरांसाठी एक उच्चतम पातळी निश्चित करून दिलेली आहे. यापुढील काळात ही कामगिरी अधिक उंचवायची असून पोल वॉल्ट क्रीडाप्रकारात ज्याप्रमाणे सरजी बुबका याने प्रत्येक वर्षी स्वत:चेच विक्रम मोडले, त्याप्रमाणे आपणही निर्धार करून आपले मानांकन उंचविण्यासाठी सज्ज व्हावे असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी त्यादृष्टीने आत्तापासूनच सुरुवात करावी असे सूचित केले.
शहर स्वच्छतेवर भर देताना नागरिकांचे राहणीमान उंचाविणे हा आपला सुशोभिकरणामागील मुख्य हेतू असल्याचे स्पष्ट करीत याबाबतच्या कार्यवाहीत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची अत्यंत महत्वाची भूमिका असून या कामात वास्तूविशारद व सजावटकार यांचेही सहाय्य घ्यावे अशी सूचना आयुक्तांनी केली.
याबाबतच्या कार्यवाहीस आत्तापासूनच सुरुवात करावी असे निर्देश देत 25 डिसेंबरपर्यंत सुभोभिकरणाची कामे पूर्ण करावीत असे आयुक्तांनी सूचित केले. याकरिता 25 डिसेंबरपासून आजपर्यंत उलट्या क्रमाने दिवस मोजून वेळेचे नियोजन करावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
उद्याने व मोकळ्या जागांचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. या अनुषंगाने सुशोभिकरण विषयक विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचे छायाचित्रांसह सादरीकरण करण्यात आले व यामध्ये आपली कल्पनाशक्ती मिसळून नवी मुंबई शहर अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न कऱण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
यापुढील काळात नवी मुंबई क्षेत्राचा विभाग कार्यालयनिहाय पाहणी दौरा करून प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय आढावा घेणार असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शहर स्वच्छता व सुशोभिकरणातील कमकुवत बाजू असलेल्या रेल्वे स्टेशन्स आणि सायन पनवेल हायवे या महानगरपालिकेच्या अखत्यारित नसलेल्या 2 बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यादृष्टीने रेल्वे स्टेशनसाठी सिडको तसेच सायन पनवेल मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने सहकार्य घेण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
“स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये देशातील तृतीय व राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून मानांकन मिळविल्यानंतर नागरिकांप्रमाणेच इतरांच्याही अपेक्षा वाढल्या असून त्यादृष्टीने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये कच-याचे तीन प्रकारे वर्गीकरण आणि स्वच्छता विषयक सर्वच बाबतीत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अधिक व्यापक स्वरुपात प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छतेची आवड असणारे नवी मुंबईकर नागरिक या कामी 100 टक्के योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला.
Published on : 15-10-2022 14:55:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update