पीएम स्वनिधी प्रक्रियेला गती देण्याच्या नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या बॅंकांना सूचना
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे काम एमएमआर क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये सर्वोत्तम झालेले असले तरी 100 टक्के अर्जदारांना आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) उपलब्ध करून देणे हे आपले उद्दिष्ट असून त्याकरिता येणा-या अडचणी दूर करून कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढाकार घ्यावा असे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बँकांच्या बैठकीप्रसंगी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी निधी मंजूर झाल्यानंतरही त्याचे वितरण न झालेले अर्ज, बँकेच्या पातळीवर प्रलंबित असलेले अर्ज आणि पुरेशा कागदपत्रांअभावी परत पाठविण्यात आलेले अर्ज या 3 गोष्टींबाबत सकारात्मक दृष्टीने कार्यवाही करावी असे बँकांच्या प्रतिनिधींना निर्देशित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, समाजविकास विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शिखर बँकेचे व्यवस्थापक श्री. भारती आणि इतर अधिकारी व विविध बँकांचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
कष्ट करून कुटुंब चालविणा-या पथविक्रेत्यांना मदतीचा हात मिळावा यादृष्टीने केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना राबविण्यास कोव्हीड प्रभावीत काळात सुरुवात केली. ज्यायोगे कोव्हीड काळातील लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणा-या पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर मोठ्या प्रमाणात झालेल्या परिणामातून त्यांना दिलासा मिळू शकेल. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात रु.10 हजार इतके खेळते भांडवली कर्ज बँकांमार्फत उपलब्ध करून दिले जात आहे. याचा लाभ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 5304 पथविक्रेत्यांनी घेतला. त्याचप्रमाणे 2040 पथविक्रेत्यांनी पहिल्या टप्प्यातील कर्ज फेड करून दुस-या टप्प्यातील रु.20 हजार इतके खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून घेतले.
पथविक्रेत्यांना हे कर्ज उपलब्ध होण्यात कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले. बँकांशी समन्वय साधून पथविक्रेत्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याकरिता विभागनिहाय समन्वयक नेमण्यात आले. विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून पथविक्रेत्यांना अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात आली. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचे काम एमएमआर क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये सर्वोत्तम आहे.
तथापि उर्वरित अर्जदारांना तसेच ज्यांचे अर्ज विविध कारणांनी प्रलंबित आहेत अथवा परत पाठविण्यात आलेले आहेत अशा सर्व अर्जदारांना आवश्यक त्रुटींची पूर्तता करून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गतीमान कार्यवाही करावी अशा सूचना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विविध बँकांच्या प्रतिनिधींना या बैठकीत केल्या.
Published on : 02-11-2022 15:16:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update