बस टर्मिनलसह वाणिज्य संकुल इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण व विहित वेळेत करण्याचे नमुंमपा आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी कऱण्यात येणा-या विविध उपाययोजनांमध्ये सेक्टर 9 ए, वाशी येथील बस स्थानकाच्या भूखंडावर बस टर्मिनलसह वाणिज्य संकुल विकसित करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आज त्या कामाच्या सदय्स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व विहित कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
त्याचप्रमाणे सदर इमारतीमधील सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर त्याची दुरुस्ती व देखभाल नियमितपणे राखली जावी याकरिता आधीपासूनच नियोजन करून सुयोग्य कार्यवाही करावी असेही निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे आणि इतर अधिकारी, वास्तुविशारद व कंत्राटदार उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका पहिवहन उपक्रमाच्या अखत्यारितीतील वाशी सेक्टर 9 येथील बस स्थानक भूखंडावर बस स्थानकासह वाणिज्य संकुलाची 21 मजली उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सद्यस्थितीत 19 व्या मजल्यावरील बांधकाम सुरु आहे. या बांधकाम स्थळी भेट देत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेतली व बारकाईने प्रत्यक्ष पाहणी करत विविध सुविधांमध्ये आवश्यक सूचना केल्या.
10374.42 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर 47731 चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येत असून जून 2023 पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या बांधकामातील प्रत्येक टप्प्याची माहिती घेत आयुक्तांनी गुणवत्ता राखून विहित वेळेत काम पूर्ण करावे असे निर्देश याप्रसंगी दिले.
या इमारतीच्या तळमजल्यावर 13 बस स्थानके असून एनएमएमटीसह बेस्ट व एसटी महामंडळाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष असणार आहेत. याशिवाय तळमजल्यावर 7 दुकाने व सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पहिला मजला ते चौथा मजला यावर पार्किंगची व्यवस्था असून एकूण 420 चारचाकी तसेच 43 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर 6 रेस्टॉरंटची सुविधा असून प्रशस्त लॉन आहे. सहाव्या ते अठराव्या मजल्यावर प्रत्येक मजल्यावर 5 अशी एकूण 65 ऑफिसेससाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 19 वा मजला विशेषत्वाने अग्निशमन व सुरक्षा विषयक बाबींकरिता उपलब्ध करून देण्यात आला असून 20 व्या व 21 व्या मजल्यावर प्रत्येकी 5 अशाप्रकारे 10 ऑफिसेस असणार आहेत.
वाशीतील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक विष्णुदास भावे नाट्यगृह व एमटीएनएल इमारतीसमोर मोक्याच्या जागी ही इमारत आकर्षक व भव्य स्वरूपात उभी राहत असल्याने बस टर्मिनलची सुविधा तसेच विविध सेवांच्या कार्यालयांसाठी, दुकानांसाठी व रेस्टॉरंटसाठी जागा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास सद्यस्थितीत होत असलेली वित्तीय तूट दूर होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर वाहतुकबाह्य उत्पन्नाचा आर्थिक स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या कामावर होणारा खर्च येथील सेवासुविधांच्या भाड्यामधून साधाऱणत: 8 वर्षांमध्ये वसूल होणे अपेक्षित असून त्याबाबतचीही वर्षनिहाय सांख्यिकी माहिती आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी जाणून घेतली आणि सदर इमारत विहित कालावधीत कामाचा दर्जा राखून उभी राहील व भविष्यात त्याची देखभाल – दुरुस्ती व्यवस्थित राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले.
Published on : 04-11-2022 10:44:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update