एनएमएमटी उपक्रमास सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ आरंबन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांचेमार्फत कोची येथे झालेल्या 15 व्या अर्बन मोबॅलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर (City with the Best Public Transport System)’ श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
केरळचे राज्यपाल श्री. आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास राज्यमंत्री ना.श्री कौशल किशोर यांचे हस्ते नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने हा राष्ट्रीय गौरवाचा पुरस्कार परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर यांनी कार्यकारी अभियंता यांत्रिकी श्री. विवेक अचलकर, मुख्य वाहतूक अधिकारी श्री.अनिल शिंदे, तुर्भे आगार व्यवस्थापक श्री.सुनिल जगताप यांचे सोबत स्विकारला.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या राष्ट्रीय मानाच्या पुरस्काराबद्दल एनएमएमटीच्या सर्व अधिकारी, कर्मचारीवृंदाचे कौतुक करीत या पुरस्कारामध्ये प्रवासी नागरिकांनी उपक्रमावर दाखविलेल्या विश्वासदर्शक सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत (Ministry of Housing & Urban affairs) प्रत्येक वर्षी शहरे, मेट्रो कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित, शहरी वाहतूक आणि सर्वोत्तम प्रकल्पांच्या विविध 12 श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
या अनुषंगाने सर्व राज्ये, मेट्रो, रेल्वे, वाहतूक उपक्रम इत्यादींकडून विहित नमुन्यात पुरस्कार प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर (City with the Best Public Transport System) या श्रेणीत नामांकन नोदविण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून करण्यात येत असलेल्या बस संचलनात -
1) पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या बसेसचा जास्तीत जास्त वापर,
2) शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 100% पर्यावरणपूरक बसेसचे प्रवर्तन,
3) मागील 06 महिन्याच्या कालावधीत 04 पटीने वाढलेली कॅशलेस तिकीट विक्री,
4) प्रवाशी जनतेस सक्षम व सुलभ पद्धतीने प्रवाशी सेवा देण्यासाठी आय.टी.एम.एस. प्रणालीचा पुरेपूर वापर
5) परिपूर्ण प्रशिक्षित चालकांकडून ई बस चालवून ई बसेसचे परिचलन सुव्यवस्थितपणे करणे
6) मागील कालावधीतील प्रति कि.मी. मध्ये झालेली वाढ व त्या तुलनेने दैनंदिन बस संचलनातील प्रति कि.मी खर्चात झालेली घट.
7) बाह्यउत्पन्न वाढीसाठी करण्यात आलेले नियोजन व वाणिज्य प्रकल्पांचा विकास
- अशा विविध बाबीं विचारात घेऊन सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर ( City with the Best Public Transport System ) या प्रकल्पास पुढील फेरीसाठी पात्र करण्यात आल्याने 20 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते.
भारत सरकाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारित स्थापन करण्यात आलेल्या इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांचेमार्फत 04 ते 06 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 15th Urban Mobility India Conference Cum Exhibition 2022 चे आयोजन बोलगट्टी कोची येथे करण्यात आले होते. या कॉन्फरन्समध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आलेल्या यशस्वी सादरीकरणानंतर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर (City with the Best Public Transport System)’ या श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार हा महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांचे मार्गदर्शन तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात कार्यरत सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचे अथक परिश्रम, परिवहन उपक्रमात कार्यरत कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी आणि परिवहन उपक्रमाच्या कार्यक्षेत्रातील प्रवाशी जनतेच्या सहकार्याने प्राप्त झाला असल्याचे मत परिवहन उपक्रमामार्फत व्यक्त करण्यात आले आहे.
Published on : 07-11-2022 13:28:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update