लहानपणापासूनच स्वच्छतेची सवय रुजविण्यासाठी ‘रंगवूया कच-याचा डबा’ आणि ‘नृत्य स्पर्धा’ जाहीर
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या व राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेली नवी मुंबई ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जाताना व्यापक लोकसहभाग घेत सज्ज झाली आहे. स्वच्छतेचा संस्कार लहान वयापासूनच मुलांच्या मनावर करण्यासाठी शालेय स्तरावर स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत.
असेच 2 अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 14 नोव्हेंबरच्या बालदिनानिमित्त आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांना असलेली चित्रकला आणि नृत्य कलेची आवड लक्षात घेऊन 2 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापनामधील दररोज नियमितपणे निर्माण होतो त्याच ठिकाणी म्हणजे घरापासूनच कच-याचे वर्गीकरण हा अतिशय महत्वाचा भाग असून घराघरात ओल्या कच-यासाठी हिरवा डबा व सुक्या कच-यासाठी निळा डबा ठेवला जात आहे. या अनुषंगाने कचरा वर्गीकरणाचे महत्व लहान मुलांमार्फत अधोरेखित व्हावे व ती त्यांचीही सवय व्हावी या दृष्टीने “रंगवूया आपला कच-याचा डबा (Paint Your Bin)” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील सहभागासाठी विद्यार्थ्यांनी कच-याचे 2 डबे घेऊन त्याचे फोटो घ्यावेत व त्यावर ओला कचरा (हिरवा डबा) आणि सुका कचरा (निळा डबा) ही संकल्पना लक्षात घेऊन विविध प्रकारे कलात्मकरित्या रंगकाम करावे. कच-याच्या डब्यांची रंगरंगोटी करताना कोणत्याही विषयाचे बंधन नाही. रंगकाम केल्यानंतर पुन्हा फोटो घेऊन डबे रंगविण्यापूर्वीचा (Before Painting) आणि डबे रंगविल्यानंतरचा (After Painting) फोटो समाज माध्यमांवर (Social Media) अपलोड करावा.
फोटो अपलोड करताना महानगरपालिकेच्या अधिकृत समाज माध्यमांचे सर्व हॅन्डल्स म्हणजेच फेसबुक (@NMMConline), ट्विटर (@NMMConline), इन्टाग्राम (nmmconline) यावर टॅग करणे अनिर्वाय आहे. त्याचप्रमाणे फोटो अपलोड करताना #HaraGeelaSookhaNeela आणि #SwachhataKeDoRang हे हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे.
अशाच प्रकारे स्वच्छ नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून किमान 5 कलावंतांच्या समुहाने आपला नृत्याविष्कार 2 मिनिटे कालावधीचा व्हिडिओ काढून nmmcdancecompetition@gmail.com इमेल आयडीवर 12 नोव्हेंबर 2022 पर्यंत अपलोड करावयाचा आहे. मोबाईलव्दारे समुह नृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्यास मोबाईलचा कॅमेरा आडवा धरणे अपेक्षित आहे. एकल (Solo) नृत्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. विशेष म्हणजे झाडू, कच-याचा डबा, हातमोजे अशा स्वच्छतेसाठी वापरल्या जाणा-या वस्तुंचा समावेश स्पर्धेसाठी सादर करण्यात येणा-या नृत्यामध्ये असणे गरजेचे राहील. यामधील 5 स्पर्धक समुहांची निवड करण्यात येऊन दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजीच्या बालदिनाच्या कार्यक्रमात त्यांचे अंतिम सादरीकरण होईल व त्यामधून सर्वोत्कृष्ट 3 क्रमांकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुलांमध्ये स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार होण्यासाठी बालदिनाचे औचित्य साधून या अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून याव्दारे मुलांमधील अंगभूत कलागुणांना उत्तेजन मिळणार आहे. तसेच नवी मुंबईच्या स्वच्छतेमध्ये नव्या पिढीचे अर्थात मुलांचे योगदान लाभणार आहे. तरी या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शाळांमधील मुलांनी सहभागी व्हावे याकरिता त्यांचे शिक्षक, पालक यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-11-2022 12:27:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update