हॉटेल्स, शाळा, सोसायट्या, मार्केट, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल स्तरावर स्वच्छता स्पर्धेव्दारे प्रोत्साहन
“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेले स्वच्छताविषयक विविध उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरिता तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण व कच-यावरील प्रक्रिया तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे तसेच या बाबींमध्ये सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील 1) हॉटेल्स, 2) शाळा (खाजगी व नमुंमपा), 3) गृहनिर्माण संस्था / RWA, 4) मार्केट असोसिएशन, 5) शासकीय कार्यालये व 6) हॉस्पिटल या प्रमुख सहा गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे गुणांकन करण्याकरिता ठराविक निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने निर्मितीच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण (Source Segregation), कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्थापन, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा व कोविड-19 या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या नियमांचे पालन अशा विविध बाबींवर भर देण्यात आलेला आहे.
या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या हॉटेल्स, शाळा (खाजगी व नमुंमपा), गृहनिर्माण संस्था / RWA, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल या संस्थांना 11 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन दिनांक 15 ते 25 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे.
या स्वच्छता स्पर्धेमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग अपेक्षित असून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.21,000/-, रु.15,000/- व रु.11,000/- रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत.
स्वच्छ शाळा स्पर्धेच्या दोन्ही गटांतील प्रथम व व्दितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.15,000/- व रु.11,000/- रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, व्दितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.51,000/-, रु.41,000/- व रु.31,000/- रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या (खाजगी व नमुंमपा) दोन्ही गटांतील प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.25,000/-, रु.21,000/- व रु.11,000/- रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच स्वच्छ मार्केट स्पर्धाकरिता प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.25,000/-, रु.21,000/- व रु.11,000/- रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्वच्छ स्पर्धेतील हॉटेल, शासकीय कार्यालय, व हॉस्पिटल या विभागातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्वच्छता ही दैनंदिन जीवनातील नियमित सवय व्हावी जेणेकरून शहर स्वच्छतेला बळकटी येईल या भूमिकेतून सोसायट्यांपासून ते हॉटेलसारख्या पर्यटक मोठ्या संख्येने येणा-या व्यावसायिक संस्थांना स्वच्छतेच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी हॉटेल्स, शाळा (खाजगी व नमुंमपा), गृहनिर्माण संस्था / RWA, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल या 6 गटात स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ नवी मुंबई मिशन यशस्वीपणे राबविण्यास आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 11-11-2022 12:03:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update