बाल महोत्सवात सांस्कृतिक सादरीकरणांतून स्वच्छतेचा जागर




स्वच्छताविषयक कोणत्याही उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. त्यामुळे देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराच्या लाभलेल्या बहुमानात नवी मुंबईतील मुलांचाही अतिशय महत्वाचा वाटा असल्याचे सांगून सर्वांचे कौतुक करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी मुले ही दिशादर्शक असतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून घराघरात कचरा वर्गीकरणाचा आणि स्वच्छतेचा संदेश पोहचेल, ही मुले स्वच्छतादूत बनून पालकांकडून ते वर्गीकरण करून घेतील आणि या माध्यमातून देशात पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचे आपले ध्येय आपण साध्य करू शकू असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या ‘स्वच्छ बाल महोत्सव’ प्रसंगी आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बालदिनानिमित्त आयोजित नृत्य, नाट्य, कीर्तन अशा विविध माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून देणा-या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कौतुक करीत आयुक्तांनी पहिला नंबर विद्यार्थ्यांना किती अभिमानाचा व हवाहवासा वाटतो हे सांगत आपल्या शहराच्या देशातील नंबर वन यशासाठी यापुढील काळात प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वर्ग, शाळा तसेच आपले घर, परिसर स्वच्छ राहील याची पुढाकार घेऊन जागरूकतेने काळजी घ्यावी अशी जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपविली. इंडियन स्वच्छता लीगच्या कार्यक्रमात ज्याप्रमाणे स्वच्छतेसाठी सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन देशात पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थी सहभागाचा विक्रम प्रस्थापित केला, तीच परंपरा कायम राखत आपण सर्व मिळून स्वच्छ सर्वेक्षणातही देशात पहिल्या क्रमांकाचे ध्येय गाठण्यासाठी कटिबध्द होऊया असे आवाहन केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकपर मनोगतातून अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी बालदिनाचे औचित्य साधून राबविलेल्या ‘नृत्य स्पर्धा’ आणि ‘रंगवूया आपला कच-याचा डबा (Paint your Bin)’ या दोन्ही उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यापुर्वीही स्वच्छताविषयक दिंडी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांना अतिशय उत्तम प्रतिसाद देऊन स्वच्छतेविषयीची आपली जागरूकता विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने दाखवून दिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
झाडू, खराटा, कचरा डबा, हातमोजे अशा स्वच्छताविषयक साहित्याचा वापर करून करावयाच्या नृत्य स्पर्धेतील 36 सहभागी स्पर्धकांतून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या 5 शाळा समुहांचे नृत्य सादरीकरण याप्रसंगी झाले. यामधून सुशिलादेवी देशमुख मराठी विद्यालय सेक्टर 4 ऐरोली या शाळेने सर्वप्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. विद्याभवन प्राथमिक शाळा नेरूळ ही शाळा व्दितीय तसेच नमुंमपा शाळा क्र. 111, तुर्भे स्टोअर ही शाळा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. नमुंमपा शाळा क्र. 46, गोठिवली आणि नमुंमपा शाळा क्र. 22 तुर्भे या शाळांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. नृत्यदिग्दर्शक सुरज विश्वकर्मा आणि पुजा साहू यांनी नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले.
बालमहोत्सवात सादर झालेल्या मनिष गजभर या विद्यार्थ्याने नमुंमपा शाळा क्र. 92, कुकशेत येथील आपल्या विद्यार्थी सहका-यांसह सादर केलेले कीर्तन अत्यंत लक्षवेधी ठरले. स्वच्छता संदेशाचे अभंग, रचनांतून अत्यंत प्रभावी सादरीकरण करणा-या कीर्तनकार विद्यार्थ्याचा आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
नाट्यमय आणि ज्ञानसाधना परिवार या कलासंस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेले मूकनाट्य तसेच ओलू सुकू घातकू या पथनाट्याला विद्यार्थ्यांकडून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून नमुंमपा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक विभागाच्या चित्रकला आणि माध्यमिक विभागाच्या निबंध स्पर्धेची पारितोषिके वितरित करण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या निबंध. चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेची पारितोषिके वितरित करण्यात आला.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जयंतीदिन अर्थात बालदिनाचे औचित्य साधून प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या स्वच्छ बाल महोत्सवात मनोरंजनातून स्वच्छता प्रबोधन करणा-या विविध कलात्मक सादरीकरणांना उपस्थित विद्यार्थ्यांनी जल्लोषात दाद दिली.
Published on : 14-11-2022 12:05:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update