नेरुळ व वाशी रुग्णालयातील आरोग्य सेवांचा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा

आरोग्य सेवा हा नागरिकांशी संबंधित अत्यंत महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व वाशी सार्वजनिक रुग्णालयांना अचानक भेट देत तेथील सुविधांची बारकाईने पाहणी करत आवश्यक सुधारणांविषयी तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, विद्युत कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड, व संबंधित अधिकारी तसेच वाशी सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोव्हीड प्रभावीत काळात आरोग्य सेवांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये घेण्यात आलेल्या उपकरणांचा फायदा यापुढील काळात सर्वसाधारण रुग्णसेवेकरिता करून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दोन्ही रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक यांना दिले.
औषधे तसेच सर्जिकल साहित्य याबाबतच्या कमतरतेविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्तांनी सखोल पाहणी करत औषधांविषयीच्या तक्रारी मुख्यालय स्तरावरून तसेच रुग्णालय स्तरावरून तातडीने दूर होतील व रुग्णांना औषधे उपलब्ध होतील याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिले. महानगरपालिका रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाला औषध चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) दिली जाऊ नये या आपल्या धोरणाचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही अशाप्रकारे कार्यवाही करावी व रुग्णांना महानगरपालिकेमार्फतच औषधे उपलब्ध करून दिली जातील याची काटेकोर दखल घ्यावी असे निर्देश याप्रसंगी आयुक्तांनी दिले. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने त्यांना बाह्य रुग्णसेवेसाठी घ्यावा लागणारा केसपेपर तसेच डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर औषधे घेण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने दररोजची रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुनर्नियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे टोकन सिस्टीम सुरु केल्यास व बसण्याची पुरेशी व्यवस्था केल्यास रुग्णांना सोयीचे होईल. त्यादृष्टीनेही जागेची उपलब्धता पाहून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी त्यांनी काही रुग्ण व नातेवाईकांशी थेट संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले व आवश्यक सूचना त्या त्या रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षकांना दिल्या.
वाशी सार्वजनिक रुग्णालय याचे बांधकाम होऊन 24 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला असल्याने त्याठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रुग्णसेवेला अडथळा न येता त्याठिकाणी आवश्यक कामे नियोजनबध्दरित्या करावीत असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. तेथील अधिकारी, कर्मचारी तसेच उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या बैठक व्यवस्थेच्या जागांचेही पुनर्नियोजन करून सुव्यवस्थित आखणी करावी अशा सूचना आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिल्या.
नेरुळ रुग्णालयातील आरटी-पीसीआर लॅबमार्फत कोव्हीड काळात अतिशय उल्लेखनीय काम झालेले असून सद्यस्थितीत 2 पैकी 1 लॅब पूर्ण क्षमतेने सुरु आहे. याच धर्तीवर दुसरीही लॅब नियमित कराव्या लागणा-या विविध चाचण्यांसाठी संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी असेही निर्देश आयुक्तांनी लॅबच्या पाहणीप्रसंगी दिले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे स्वत:चा मायक्रोबायलॉजी विभाग सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
कोव्हीड काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यादृष्टीने महानगरपालिकेने आवश्यकतेनुसार ऑक्सिजन टँकची उभारणी केली आहे. या एलएमओ टँकच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये कार्यान्वित आयसीयू करिता या ऑक्सिजनचा पुरवठा नियमित सुरु ठेवावा अशाही सूचना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी दिल्या.
महानगरपालिकेच्या रुग्णसेवेवर बहुतांशी नागरिक अवलंबून असतात. त्यातही नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या आधुनिक शहरातील महानगरपालिकेकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे महानगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी येणा-या रुग्णांची संख्याही मोठी असते हे लक्षात घेऊन कर्मचा-यांची कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीने कोव्हीड काळात घेतलेल्या वैद्यकिय कर्मचा-यांचा वापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे समारंतररित्या नियमित भरतीच्या प्रक्रियाही सुरु करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
नेरुळ व वाशी रुग्णालयात पदव्युत्तर पदवी मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही सुरु असून पीजी इन्स्टिट्युट अंतर्गत निर्माण केल्या जाणा-या केंद्रीय लायब्ररीच्या कामाची पाहणी करताना आयुक्तांनी एक आठवड्यात काम पूर्ण करण्याचे निर्देशित केले. इन्स्टिट्युचे काम नियोजनबध्दरित्या करून विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निश्चित आराखड्यानुसार अंमलबजावणी करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी असून आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या सेवेप्रती तत्पर राहून काम करावे व या माध्यमातून नागरिकांना समाधानकारक आरोग्य सेवा द्यावी असे या पाहणी दौ-यादरम्यान आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.
Published on : 17-11-2022 13:49:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update