सुविधा कामे विहित वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु असलेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अपेक्षीत कालावधीत नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांना आढावा बैठकीप्रसंगी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रत्येक विभागामार्फत तत्परतेने करावयाच्या कामांचा तसेच नियोजित कामांची सविस्तर माहिती घेतली. केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या निवास योग्य शहरांच्या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहचावे व त्यांचे अभिप्राय http:/bit.ly/3ObpOa9 या लिंकवर नोंदविले जावेत याविषयी कृतीशील कार्यवाही करावी असे सर्व विभागप्रमुखांना निर्देश देण्यात आले.
महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक औषध उपलब्धतेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा आयुक्तांनी घेतला व ही कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देशित केले. कोव्हीड केंद्रातील बेड्स व इतर साहित्य पुनर्वापरात आणण्याबाबत शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
झोपडपट्टी तेथे ग्रंथालय ही संकल्पना कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती कार्यान्वित होण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. मार्केटच्या वास्तू वापरात आणण्याच्या दृष्टीने ओटले वाटपाची कार्यवाही लवकरात लवकर करून घ्यावी तसेच फेरीवाला धोरण अंमलात आणून उचित कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करावा असेही परवाना विभागास सूचित करण्यात आले.
घणसोली येथील बांधकाम सुरु असलेल्या नागरी आरोग्य केंद्राचे काम या महिना अखेरपर्यंत पूर्ण करून त्याठिकाणी नागरी आऱोग्य केंद्र सुरु कऱण्याची कार्यवाही तत्परतेने करावी अशाही सूचना अभियांत्रिकी व आरोग्य विभागास आयुक्तांनी दिल्या.
सिडकोने दिव्यांग स्टॉल्ससाठी उपलब्ध करून दिलेल्या प्लॉटवर लवकरात लवकर दिव्यांग सन्मान किऑक्स बसवून ते वापरात येतील याबाबतची कार्यवाही गतीमानतेने करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा व स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबतची सोडत उत्तम रितीने पारदर्शक पध्दतीने पार पडली असून स्टॉल धारकांना लवकरात लवकर प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करता येईल यादृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम लिडार तंत्रज्ञानाव्दारे सुरु असून ते या वर्षाअखेरपर्यंत व्यवस्थित नियोजन करून पूर्ण करावे जेणेकरून जानेवारी ते मार्च या कालावधीत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून आगामी एप्रिल 2023 पासून सुरु होणा-या आर्थिक वर्षात मालमत्तांना नवीन देयके देणे शक्य होईल अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेची मंगल कार्यालये सुव्यवस्थित रितीने सुरु असून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या लग्न व इतर समारंभासाठी लाभदायक ठरत आहेत. त्या अनुषंगाने आगामी लग्नसराईचा कालावधी लक्षात घेऊन त्याठिकाणी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने करून घ्यावीत असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी विभाग अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्रातील मंगल कार्यालयांची पाहणी करून त्यामधील आवश्यक गोष्टींचा अहवाल विभाग प्रमुखांकडे सादर करावा व विभागप्रमुखांनी ती कामे प्राधान्याने संबंधित विभागांकडून करून घ्यावीत असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणारे व मानांकन उंचाविणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून तशा प्रकारच्या अपेक्षा शासन स्तरावरून व नागरिकांकडूनही व्यक्त केल्या जातात. त्यामुळे आपली जबाबदारी मोठी असून निश्चय केला - नंबर पहिला हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबध्द व गतीमानतेने कामे करावीत आणि त्यातही स्वच्छता विषयक छोट्या छोट्या बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. स्वच्छता विषयक कामांचा विभागनिहाय आढावा आपण स्वत: घेणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याने आपल्याकडून जनतेच्या व शासनाच्या मोठ्या अपेक्षा असून त्यादृष्टीने प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण होईल याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश यावेळी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
Published on : 21-11-2022 12:30:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update