‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षणातील सहभागासाठी नागरिकांना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छतेसह वैशिष्टयपूर्ण प्रकल्प, कामांमुळे तसेच दर्जेदार सेवासुविधांमुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध बहुमान, पुरस्कार प्राप्त झाले असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभागाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. देशातील एक लक्षणीय शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वत्र नावलौकिक होत असताना येथील नागरी सुविधांच्या उत्तम दर्जामुळे नवी मुंबईकर रहिवाशी होण्याची इच्छा अनेकजण सोशल मिडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून व्यक्त करताना दिसतात.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील निवासयोग्य शहरांची स्पर्धा ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ आयोजित करण्यात आली असून यामध्ये नवी मुंबई शहर उत्साहाने व पूर्ण क्षमतेने सहभागी झाले आहे. या स्पर्धेंतर्गत नागरिक अभिप्राय सर्वेक्षण (Citizen Perception Survey) करण्यात येत असून शहरातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतुक व्यवस्था अशा विविध बाबींविषयी नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येत आहेत. हे अभिप्राय घेण्याकरिता http:/bit.ly/3ObpOa9 ही लिंक केंद्र सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामधील 17 प्रश्नांवर योग्य पर्याय निवडून नागरिकांनी विविध विषयांवर अभिप्राय नोंदवायचे आहेत.
या सर्वेक्षणाची माहिती नागरिकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहचण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी यापूर्वीच अधिका-यांच्या विशेष बैठकीत दिले होते.
यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत: तसेच आपले कुटुंबिय यांचे अभिप्राय प्राधान्याने नोंदवावेत त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर सोसायट्या, शाळा – महाविद्यालये, सरकारी तसेच खाजगी आस्थापना, उद्योग, व्यवसाय ठिकाणे येथे भेटी देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नवी मुंबई शहरविषयी मनात असलेली प्रेमाची व अभिमानाची भावना या अभिप्रायाच्या स्वरूपात दाखल करण्याविषयी नागरिकांपर्यंत पोहचण्याचे सूचित केले होते. याबाबत झालेल्या कार्यवाहीचा विभागनिहाय सविस्तर आढावा आयुक्तांनी अधिका-यांच्या बैठकीत घेतला आणि याबाबतची कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात व गतीमानतेने करण्याचे विभागप्रमुखांमार्फत सर्व अधिकारी, कर्मचारीवृंदाला निर्देश दिले.
केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या Ease Of Living Survey मध्ये नवी मुंबई शहराविषयी व तेथील सुविधांविषयी अभिप्राय व्यक्त करण्याची एक नामी संधी नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. तरी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये http:/bit.ly/3ObpOa9 या लिंकवर क्लिक करून नागरिक अभिप्राय सर्वेक्षण (Citizen Preception Survey) यामध्ये भाषा निवडून रेफरल कोड 802788 टाकावा व त्यानंतर स्वत:चे नाव, आडनाव, नोकरी/व्यवसाय, स्त्री/पुरूष, वय, शिक्षण, राज्य, शहर टाकून 17 प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे नोंदवावीत आणि आपल्या नवी मुंबई शहराविषयी मनात असलेले प्रेम व सार्थ अभिमान व्यक्त करीत नवी मुंबईला देशातील नंबर वन निवासयोग्य शहर बनविण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-11-2022 15:13:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update