*संविधान हा मौलिक विचार असून तो मनात रूजविण्याची गरज – लेखक श्री. सुरेश सावंत*
नवी मुंबई महानगरपालिकेने साकारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक त्यांच्या विचारांचा वारसा जपणारे असून, स्मारक पाहिले आणि मी भारावूनच गेलो अशा शब्दात संविधानाचे अभ्यासक, लेखक श्री. सुरेश सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करीत याठिकाणी भेट देणा-या नागरिकांना मूल्यवान ठेवा सापडल्याची अनुभूती येईल असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सविधान दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला ऐरोली, सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेअंतर्गत ‘माझे संविधान – माझा अभिमान’ या विषयावर लेखक श्री. सुरेश सावंत यांनी श्रोत्यांशी सुसंवाद साधत संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेपासून त्याचे वर्तमानातील महत्व अत्यंत प्रभावीपणे अभिव्यक्त केले.
संविधान हा जनतेच्या आकांक्षांचा संकल्प असून आपल्या विकासाचा आराखडा असल्याचे सांगत श्री. सुरेश सावंत यांनी नागरिक म्हणून आपल्या विकासाची सुरूवात संविधानामुळे होते असे म्हटले. आपल्याला उद्देशिका पाठ असते मात्र तिचा अर्थ आपण समजून घेत नाही. उद्देशिकेतील प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा असून तोलून मापून वापरलेला असल्याचे सांगत त्यांनी उद्देशिका नीट समजून घेतली तर संविधान समजेल असे स्पष्ट करीत नानी पालखीवाला यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘उद्देशिका हे घटनेचे ओळखपत्र’ असल्याचे म्हटले.
संविधान निर्मितीची प्रक्रिया समजून घेताना आपल्याला बहुपेडी भारतीय संस्कृती समजून घेणे महत्वाचे असल्याचे सांगत श्री. सुरेश सावंत यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देत संविधानातील ‘बंधुता’ अर्थात ‘सहभाव’ हा अतिशय महत्वाचा शब्द बाबासाहेबांची देन असल्याचे सांगितले.
संविधान सभेमध्ये बाबासाहेबांची निवड, त्याची प्रक्रिया, त्यांची संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती, संविधान निर्मितीमधील त्यांचे योगदान, घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा होणारा गौरव अशा विविध बाबींवर श्री. सुरेश सावंत यांनी त्या कालखंडातील घटना, प्रसंग कथन करीत प्रकाशझोत टाकला.
बाबासाहेब हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते, त्यामुळे घटनेव्दारे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचे हक्क प्रदान करण्यात आले असून त्याची जपणूक आपण केली पाहिजे असे सांगत श्री. सुरेश सावंत यांनी संविधान ही केवळ नियमावली नाही तर तो एक विचार आहे हे ओळखून तो जपण्यासाठी मनात रूजविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी बोलताना स्मारकातील अशा प्रकारच्या व्याख्यानांच्या सातत्यपूर्ण आयोजनातून बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारांशी समरस होऊन काम करण्याचा आनंद मिळतो असे सांगत संविधानासारखा विषय हा हिरा आहे त्याला स्मारकासारखे विचारप्रवर्तक कोंदण लाभले म्हणून हा हिरा अधिक झळाळून निघाला असल्याचे मत व्यक्त केले. सर्वसाधारपणे सांस्कृतिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या शहरांतही आता व्याख्यानांना फारशी गर्दी होत नसल्याचे चित्र दिसत असताना नवी मुंबईतील श्रोते स्मारकातील व्याख्यानांना मोठ्या संख्येने गर्दी करतात हे चित्र समाधान देणारे असल्याचे मत मांडत आयुक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी संविधान दिनाचे औचित्य साधून शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात आयोजित करण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, लेखक वक्ते श्री. सुरेश सावंत, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, ठाणे जिल्हा समाज कल्याण विभाग सहा. आयुक्त श्री. समाधान इंगळे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करून अभिनंदन करण्यात आले.
संविधान दिनाचे औचित्य साधून स्मारकातील समृद्ध ग्रंथालयामध्ये संविधान विषयक साहित्याच्या ‘संविधान विशेष’ या दालनाचा शुभारंभ महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याठिकाणी माजी महापौर श्री.सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका श्रीम. हेमांगी सोनावणे, श्री. अब्दुल जब्बार खान व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
Published on : 26-11-2022 13:28:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update