*डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयातील ‘संविधान विशेष’ दालन वाचक, अभ्यासकांसाठी उपयुक्त*
ऐरोली सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच नागरिकांनीही तेथील अत्याधुनिक ई बुक, ऑडिओ बुकसह समृध्द ग्रंथालयाची विशेष प्रशंसा केलेली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेल्या पुस्तकांप्रमाणेच त्याठिकाणी त्यांच्या विचारप्रणालीवर आधारित विविध पुस्तकांचा ठेवा उपलब्ध आहे. तो वाचकांप्रमाणेच अभ्यासकांच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचा आहे.
सद्यस्थितीत ग्रंथालयात 18 विषयांनुसार 3 हजारांहून अधिक ग्रंथांची विषयनिहाय आकर्षक मांडणी केलेली आहे. यामध्ये अधिक सुनियोजितता आणत संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयामध्येच ‘संविधान विशेष‘ स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. या दालनाचा शुभारंभ महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, लेखक व वक्ते श्री. सुरेश सावंत, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, ठाणे जिल्हा समाजकल्याण विभाग सहा. आयुक्त श्री. समाधान इंगळे, कार्यकारी अभियंता विद्युत श्री. प्रवीण गाढे उपस्थित होते. माजी महापौर श्री.सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका श्रीम. हेमांगी सोनावणे, श्री. अब्दुल जब्बार खान व इतर मान्यवर व्यक्तींनीही याप्रसंगी उपस्थित राहून ‘संविधान विशेष’ दालनाच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक केले.
सर्वसाधारण ग्रंथालयांप्रमाणे कपाटांमध्ये ओळीने पुस्तके मांडून न ठेवता या ग्रंथालयातील वेगळ्या स्वरूपाच्या रॅकमध्ये त्यांची अत्यंत आकर्षक स्वरूपात मांडणी केल्याचे लक्षात येते आणि वाचक त्या ग्रंथालयाच्या प्रेमात पडतो अशी भावना अनेकांनी व्यक्त केलेली आहे.
ग्रंथालयात 6 स्क्रीन टच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त संगणक ठेवण्यात आले असून त्यामध्ये ऑडिओ बुक्स तसेच ई बुक्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याशिवाय बाबासाहेबांची दुर्मिळ व्हिडिओ तसेच त्यांच्यावरील विचार मालिकाही या स्क्रीनवर पाहता येतात. संविधान विशेष दालनातील ग्रंथसंपदेसोबतच ग्रंथालयातील संगणकांवर संविधानविषयक चित्रफिती तसेच संविधान निर्मितीच्या काळात वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तांची स्कॅन कात्रणेही अभ्यासकांना बघता येणार आहेत. त्याही सुविधेचा शुभारंभ आयुक्तांनी यावेळी केला.
भारतीय संविधान हे बिहारी नारायण रायजादा या मान्यवर सुलेखनकारांनी सहा महिने अथक काम करून सुलेखनाव्दारे स्वहस्ताक्षरात लिहिलेले असून हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे. त्याच्या मूळ प्रतीची प्रतिकृती या ‘संविधान विशेष’ दालनामध्ये पाहता येणार असून हे या दालनाचे मोठे आकर्षण असणार आहे. याशिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील संविधानविषयक विविध माहितीपूर्ण पुस्तकेही याठिकाणी उपलब्ध आहेत व त्यामध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय या
स्मारकात उपलब्ध विविध सुविधांमध्ये ग्रंथालय हा या स्मारकाचा आत्मा असून ते अधिकाधिक परिपूर्ण व समृध्द करण्याचा महानगरपालिकेचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे असे सांगताना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सद्यस्थितीत 3 हजाराहून अधिक असलेली ग्रंथसंपदा 5 हजार करून ग्रंथसंपदेचे उद्दिष्ट पूर्ण करणे ही महानगरपालिकेसाठी कठीण गोष्ट नाही हे सांगितले. मात्र याठिकाणी उपलब्ध करून द्यावयाचे ग्रंथ हे वाचकांसाठी तसेच अभ्यासकांसाठी उपयुक्तच असावेत हा आमचा ध्यास असून त्यादृष्टीने योग्य ग्रंथनिवड करूनच ग्रंथालय समृध्दीकडे वाटचाल करीत आहोत असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू होत असलेले ग्रंथालयातील ‘संविधान विशेष’ हे दालन वाचक आणि अभ्यासकांसाठी एक मौलिक ठेवा असल्याचे सांगत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या दालनाचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
Published on : 26-11-2022 13:44:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update