कचरा संकलन करणा-या स्वच्छताकर्मींच्या आकर्षक जॅकेट्सव्दारे ओलू - सुकू कचरा वर्गीकरणाचा प्रसार
दैनंदिन शहर स्वच्छतेमध्ये कचरा संकलीत करणा-या कामगारांचाही मोठा वाटा आहे. घराघरातच कच-याचे ओला, सुका अशाप्रकारे वर्गीकरण करण्यावर भर देण्याप्रमाणेच हा वर्गीकृत कचरा वेगवेगळ्या कचरा गाड्यांमध्ये अथवा कचरा गाड्यांमधील स्वतंत्र कप्प्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जात आहे.
प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी म्हणजे घरातच वेगवेगळा ठेवणे व तो कचरा गाड्यांमध्ये देतानाही वेगवेगळा देणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने प्रचार व प्रसार व्हावा याकरिता ओल्या कच-यासाठी ओलू आणि सुक्या कच-यासाठी सुकू असे अनुक्रमे हिरव्या व निळ्या रंगातील कचरा डबे कार्टुन स्वरुपात महानगरपालिकेच्या वतीने प्रसिध्द करण्यात आले आहेत.
या ओलू व सुकू डब्यांच्या प्रचार - प्रसिध्दीसाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जात असून कचरा संकलीत करणा-या 720 कचरा गाड्यांवरील वाहनचालक व स्वच्छताकर्मींना फ्ल्युरोसंट रंगाचे जॅकेट्स देण्यात आले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे उपस्थित होते.
या जॅकेटवर पुढील बाजूस नवी मुंबई महानगरपालिकेचे बोधचिन्ह तसेच स्वच्छता के दो रंग #हरागिलासुखानिला हे स्वच्छ भारत मिशनचे केंद्र सरकारमार्फत जाहीर अभियानाचे बोधचिन्ह प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जॅकेटच्या समोरील खालील बाजूस ओलू व सुकू या कार्टुन्सची चित्रे प्रसिध्द करून ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा आणि ते ठेवण्याच्या डब्याचे रंग हिरवा व निळा आहे अशाप्रकारे जनजागृती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जॅकेटच्या मागील बाजूस आगामी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ चे बोधचिन्ह व सर्वेक्षणाला सामोरे जाताना महानगरपालिकेने नजरेसमोर ठेवलेले ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे ध्येय वाक्य आणि ‘इंडिया व्हर्सेस गार्बेज’ या केंद्र सरकारमार्फत जाहीर अभियानाचे बोधचिन्ह प्रदर्शित करण्यात आले आहे.
या जॅकेट्सच्या माध्यमातून कचरा वर्गीकरणाचा संदेश नागरिकांपर्यंत दररोज नागरिकांपर्यंत कचरा संकलनासाठी पोहचणा-या स्वच्छताकर्मींमार्फत प्रसारित केला जात असून या फ्ल्युरोसंट रंगाच्या जॅकेट्समुळे कचरा संकलन करणा-या स्वच्छताकर्मींना स्वतंत्र ओळख देखील प्राप्त झालेली आहे.
Published on : 05-12-2022 11:22:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update