स्वच्छता कार्यात नागरिकांचा उत्साही सहभाग
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये देशातील तृतीय मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार आठही विभागांमध्ये व्यापक लोकसहभागावर भर देत विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात आहेत.
रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लोक घरी असतात त्यामुळे वेळ काढून विविध उपक्रमात उत्साहाने सहभागी होऊ शकतात हे लक्षात घेऊन 11 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा तसेच स्वच्छता विषयक जनजागृतीपर कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले.
यामध्ये बेलापूर विभागात सेक्टर 46 ए, सीबीडी बेलापूर येथील निळकंठ रेसिडेन्सी याठिकाणी सोसायटीतील नागरिकांना पदाधिकारी व तेथील सफाईकर्मी यांच्यासह एकत्र करून कचरा निर्मिती कमी करणे, कच-याचा पुनर्वापर करणे व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे अर्थात थ्री आर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे कचरा वर्गीकरणाचे महत्व सांगून कचरा हा घरापासूनच ओला, सुका व घरगुती घातक अशा 3 प्रकारे वर्गीकरण करावा तसेच कंपोस्ट बास्केट वापरून ओल्या कच-याची खत निर्मितीव्दारे घरातच विल्हेवाट लावावी असे आवाहन करण्यात आले. सोसायटीमध्ये घरांची संख्या मोठी असल्याने त्याठिकाणी कंपोस्ट पीट्सचा प्रभावी वापर करावा असेही सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे प्लास्टिकला हद्दपार करून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे महत्व पटवून देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणातील महानगरपालकेला मिळणारा नंबर हा सर्वांच्या एकत्रित सहभागाचा परिणाम असून ‘निश्चय केला - नंबर पहिला’ या आपल्या शहराच्या ध्येयासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असेही आवाहन कऱण्यात आले.
अशाच प्रकारे दिघा येथील कृष्णविहार इमारतीतील रहिवाशांना त्याचप्रमाणे सम्राट नगर, नोसिलनाका येथील झोपडपट्टी क्षेत्रातही विशेष स्वच्छता मोहिम राबवित तेथील नागरिकांनाही कचरा वर्गीकऱणाचे महत्व पटवून देण्यात आले. झोपडपट्टीबहुल क्षेत्रात घऱाघरात ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवला जावा याविषयी वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचे निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिलेले असून त्यादृष्टीने झोपडपट्टी भाग व गांवठाणांकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.
नवी मुंबईला विस्तारित खाडी किनारा लाभलेला असून तेथील परिसर स्वच्छतेकडेही महानगरपालिकेमार्फत लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने एसआयईएस जीएसटी कॉलेज आणि मॅग्रु्व्हज् मार्शल या पर्यावरणविषयक स्वयंसेवी संस्थेच्या एकत्रित सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सागर विहार सेक्टर 8 वाशी येथे परिसर स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये 60 हून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेत साधारणत: 5 टन कचरा संकलीत केला. यामध्ये प्लास्टिक बाटल्या, टाकाऊ प्लास्टिक, थर्माकोल याचे प्रमाण मोठे होते. त्यासोबतच सागर विहार येथे मोठ्या संख्येने उपस्थित असणा-या नागरिकांना थ्री आर, कचरा वर्गीकरण, प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर रोखणे तसेच वृक्षारोपण व संवर्धन याचे महत्व विषद करण्यात आले.
अशीच ऐरोली विभागात ‘विथ देम फॉर देम’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने खाडी किना-यावरील खारफुटीत स्वच्छता मोहीम राबवित 700 किलो प्लास्टिक व इतर कचरा संकलीत करण्यात आला. अशाच प्रकारची विशेष मोहीम सेक्टर 20, ऐरोली पटनी रोड येथे खाडीकिनारी घेण्यात आली. त्या ठिकाणीही ऐरोली गावांतील पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच निर्धार फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याठिकाणी प्लॉग रन उपक्रम राबविण्यात आला तसेच 1 क्विंटल प्लास्टिक व सुका कचरा संकलीत करून खाडी किनारा स्वच्छ करण्यात आला.
सीबीडी बेलापूर सेक्टर 8 परिसरातही नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कार्यात रोटरॅक्ट क्लब ऑफ भारती विद्यापीठ यांचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी सक्रीय सहभाग घेतला. येथील विशेष स्वच्छता मोहिमेत 1 टनापेक्षा अधिक प्लास्टिक व इतर कचरा संकलीत करून परिसर चकाचक करण्यात आला.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ च्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींनाही अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळावी यादृष्टीने तुर्भे विभागात जनता मार्केट हजेरी शेडच्या ठिकाणी स्वच्छताकर्मींना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये स्वच्छतेचे काम करताना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा साधनांचा स्वआरोग्य रक्षणाच्या दृष्टीने नियमित वापर करण्याचे स्वच्छताकर्मींना सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम व शिक्षणाचा हक्क कायदा याचीही माहिती त्यांना देण्यात आली. स्वच्छतेचे काम करताना स्वच्छताकर्मींनी त्यांच्या संपर्कात येणा-या नागरिकांना घरातूनच ओला, सुका व घरगुती घातक असे कच-याचे 3 प्रकारे वर्गीकरण करण्याचे आवाहन करावे असे सूचित करण्यात आले. अशीच कार्यशाळा शनिवारी 10 डिसेंबरलाही ऐरोलीनाका परिसरातील सफाई कामगारांची घेण्यात आली.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर दर आठवड्याला त्या सप्ताहात झालेल्या स्वच्छता विषयक कामांचा आढावा घेत असून या अनुषंगाने प्रत्येक विभागामध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्याची निकोप स्पर्धा सुरु झाली आहे. या माध्यमातून लोकसहभागातून स्वच्छता हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य होताना दिसत आहे.
Published on : 12-12-2022 13:05:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update