लोकाभिमुख प्रवासी सेवेला प्राधान्य देण्याचे नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचे एनएमएमटीला निर्देश Inbox
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमार्फत दररोज 2.5 लाखाहून अधिक नागरिकांना प्रवाशी सेवा पुरवित असून ती प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सुविधाजनक व्हावी याकरिता सकारात्मक उपाययोजना कराव्यात तसेच कोणताही परिवहन उपक्रमाचे साध्य हे नफा कमाविणे नसले तरीही होणारा तोटा कमीत कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या मुख्यालय भेटीप्रसंगी दिले.
बेलापूर भवन येथील एनएमएमटी मुख्यालयातील कार्यपध्दतीची तसेच आयटीएमएस अर्थात इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमची आयुक्तांनी बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत एनएमएमटीच्या 567 बसेस 76 बस मार्गांवर कार्यरत असून तुर्भे, आसुडगांव व घणसोली येथील 3 आगारांमधून या बसेसचे दैनंदिन परिचलन होते. या परिचलनामध्ये कोणत्या आगारातून दैनंदिन किती बसेसचे परिचलन होते, त्यामध्ये स्वत:च्या बसेस तसेच जीसीसी तत्वावरील बसेस किती, त्याचप्रमाणे सर्वसाधारण बसेस, सीएनजी बसेस, व्होल्वो बसेस, इलेक्ट्रिक बसेस अशा सर्व प्रकारच्या बसेसच्या परिचलनाची त्यांनी बारकाईने माहिती जाणून घेतली. यामध्ये खोपोली, कर्जत, रसायनी, उरण, फोर्ट, बोरीवली, अंबरनाथ, बदलापूर अशा विविध मार्गांवर प्रवासी सेवा पुरवित असताना किफायतशीर अर्थात कमी तोटा असणारे बस मार्ग कोणते याचीही त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
एनएमएमटी उपक्रमामधील कायमस्वरुपी तसेच रोजंदारीवरील आणि कंत्राटी स्वरुपातील कर्मचारीवर्गाची संवर्गनिहाय माहिती जाणून घेताना इतर परिवहन सेवांच्या तुलनेत एनएमएमटीचा प्रतिबस कर्मचारी मानांक इतरांपेक्षा बराच कमी 5.58 इतका असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्यांनी कर्मचा-यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. बस चालकांची वैद्यकीय चाचणी त्यातही दृष्टीचाचणी नियमितपणे केली जावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे वैद्यकीय विमा काढण्याबाबतही जलद कार्यवाही करावी असेही त्यांनी सूचित केले.
वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी 12 बसेस रात्री मुक्कामी थांबवून किमी धाव वाचविली जात आहे. यामुळे 1181.8 कि.मी. ची दैनंदिन बचत होऊन मासिक 11 लाख रक्कमेची बचत होत असल्याची माहिती घेत असताना आयुक्तांनी यापेक्षा अधिक बस मुक्कामी ठेवण्याबाबत सर्वेक्षण करावे असे सूचित केले. याशिवाय शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात डिझेल बसेस ऐवजी इलेक्ट्रीक बसेस चालवून इंधन बचत केली जाते, त्या इलेक्ट्रिक बस संख्येमध्येही वाढ करण्याबाबत चाचपणी करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
एनएमएमटी परिवहन उपक्रमाचे डबलडेकर बस घेण्याचे नियोजन असून त्या कोणत्या बसमार्गांवर चालविणार याची सविस्तर माहिती घेत आयुक्तांनी डबलडेकर बसेसची वाहतुक व परिचलन योग्य रितीने करता येईल असे मार्ग निवडावेत आणि ते निवडताना जास्तीत जास्त प्रवाशांना लाभ होईल अशा मार्गांची निवड करावी अशा सूचना केल्या.
प्रवाशांना त्यांच्या नजीकच्या बस थांब्यापासून हव्या असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या बसेस उपलब्ध आहेत व त्या किती वेळात त्यांच्या थांब्यावर येणार आहेत याची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणा-या NMMTBusTracker या मोबाईल ॲपची आयुक्तांनी संपूर्ण माहिती करून घेतली. त्याचप्रमाणे एकाच कार्डवर कोणत्याही स्वरुपाच्या प्रवासाचे तिकीट काढता येऊ शकेल असे एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देणेविषयी पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी आयुक्तांनी त्याक्षणी बस मार्गांवर धावत असलेल्या बसेसचे लाईव्ह ट्रॅकींग करणा-या आयटीएमएस प्रणालीची पाहणी केली. यामध्ये काही बसेसची त्या त्या मार्गांवरील सद्यस्थिती जाणून घेतली व सर्व बसेसमधील जीपीएस प्रणाली सुरु राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आणि त्याचे विशिष्ट पथकाव्दारे परीक्षण करण्याचे निर्देश दिले. या प्रणालीकरिता सध्या टू जी नेटवर्क वापरले जात असून त्याचे अद्ययावतीकरण करावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे 10 महिला स्पेशल तेजस्विनी बसेस असून 64 महिला कंडक्टर आणि 1 महिला ड्राईव्हर आहे. यापुढील काळात महिला ड्राईव्हर यांना प्राधान्य द्यावे व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नमुंमपा परिवहन उपक्रमाने सकारात्मक पाऊल टाकावे अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
केंद्र सरकारच्या फेम इंडिया वन योजनेअंतर्गत 30 इलेक्ट्रीकल बसेस अनुदानाव्दारे उपलब्ध करून घेण्यात आल्या असून फेम इंडिया 2 योजनेअंतर्गत जीसीसी तत्वावर 150 इलेक्ट्रीकल बसेस चालविण्यात येत आहेत. यामध्ये वाढ कऱण्याची कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित कऱण्यात आले. त्याचप्रमाणे फेम 2 योजनेअंतर्गत 20 ठिकाणी उभारण्यात येणा-या चार्जींग स्टेशन कार्यान्वित करण्याच्या कामाला गती द्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. वाशी येथील बस डेपोचा वाणिज्यिक तत्वावर होणारा विकास एनएमएमटीचा तोटा भरून काढणारा असून ते काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाहीकडे लक्ष द्यावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नवी मुंबईची प्रवासी जीवनवाहिनी ही एनएमएमटी बससेवेची ओळख असून ती अधिक सक्षम आणि प्रवासीकेंद्री होण्याकडे लक्ष पुरवून त्यासाठी जे जे करणे शक्य असेल ती कार्यवाही करावी असे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या पाहणी दौ-याप्रसंगी सूचित केले.
Published on : 14-12-2022 13:43:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update