नवी मुंबईत नागरिकांपर्यंत पोहोचून पटवून दिले जात आहे स्वच्छतेचे व प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्व
















घनकचरा व्यवस्थापनातील कचरा वर्गीकरण हा सर्वात महत्वाचा भाग असून नागरी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घरातूनच कचरा वर्गीकरण करून दिला जातो. ही वर्गीकरणाची व्यापकता झोपडपट्टी व गांवठाण भागातही रुजावी यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात वस्त्या-वसाहतींमध्ये घरोघरी पोहचून कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. त्याचप्रमाणे घरातच कंपोस्ट बास्केट वापरून ओल्या कच-याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावून खत निर्मिती करण्याच्या पर्यायाची माहिती करून दिली जात आहे.
घणसोली विभाग कार्यालयामार्फत कातकरीपाडा भीमनगर येथे परिसरातील नागरिकांना ठिकठिकाणी एकत्र करून घरात दररोज निर्माण होणारा कचरा ओला, सुका व घरगुती घातक असा 3 प्रकारे वेगवेगळा ठेवणे व महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देणेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यासोबतच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करून त्याऐवजी कापडी व कागदी पिशव्या वापराव्यात असेही आवाहन कऱण्यात आले. नागरिकांनी स्वत:हून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे ठरवले तर हे सहज साध्य होऊ शकते असेही सूचित करण्यात आले.
अशाच प्रकारची विशेष जनजागृती मोहिम कोपरखैरणे विभागात एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी भागात घेण्यात आली. महानगरपालिकेच्या पथकांमार्फत घरोघरी जाऊन ओल्या कच-यामध्ये व सुक्या कच-यामध्ये कोणते घटक येतात याची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.
सेक्टर 27 बेलापूर येथील ओम सिध्दी या मोठ्या सोसायटीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच कचरा वर्गीकरण हे नियमित करावे आणि कंपोस्ट पिट्सव्दारे आपल्या सोसायटीच्या आवारातच घराघरातून संकलित होणा-या ओल्या कच-यावर प्रक्रिया प्रकल्प राबवावा व नियमित कार्यान्वित ठेवावा असे सांगितले. प्लास्टिकमुळे होणारी हानी लक्षात घेऊन कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन करतानाच रहिवाशांना विनामुल्य कापडी पिशव्यांचे वापट करण्यात आले.
अशाचप्रकारे महात्मा गांधी कॉम्प्लेक्स, सेक्टर 14 वाशी येथे नागरिकांना एकत्र करून कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक श्री. प्रकाश मोरे यांनीही नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेच्या स्वच्छता कार्यात नेहमीप्रमाणेच सक्रीय सहभाग राहील असा विश्वास व्यक्त केला.
कोपरखैरणे येथील सेक्टर 2 मधील सिध्देश्वर सोसायटीतही महानगरपालिकेमार्फत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर 3 परिसरातील नागरिकांना एकत्र करून त्यांनाही कचरा वर्गीकरण, घरातच खत निर्मिती व प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याविषयी आवाहन करण्यात आले.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे आरोग्याला व स्वच्छतेला होणारी हानी लक्षात घेऊन ‘नको पिचकारी, फक्त कलाकारी’ हे थुंकणे प्रतिबंधक अभियान प्रभावीपणे राबवून शहर स्वच्छतेमधील या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सेक्टर 11 सीबीडी बेलापूर येथील खाऊ गल्ली, वाशी सेक्टर 15 येथील नाका कामगार उभे राहतात तो चौक, लोकमान्य टिळक मार्केट सेक्टर 1 वाशी, सेक्टर 6 वाशी येथील एफ टाईप मार्केट तसेच सेक्टर 2 व 3 कोपरखैरणे येथील रिक्षा स्टँड आणि वाशी रेल्वेस्टेशन समोरील रिक्षा स्टँड याठिकाणी संबंधित विभागांच्या स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक पथकाने जाऊन त्याठिकाणी असलेले रिक्षा चालक, नाका कामगार, पानपट्टी चालक, व्यावसायिक यांना एकत्र करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये याविषयी प्रबोधन केले.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 करिता नवी मुंबई शहर पूर्ण क्षमतेने सज्ज होत असून लोकप्रबोधनासोबतच लोकसहभागावरही विविध उपक्रम राबवून भर दिला जात आहे.
Published on : 15-12-2022 13:28:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update