‘ड्राय वेस्ट बँक’ या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार
लहान वयापासूनच स्वच्छतेचे संस्कार मुलांच्या उमलत्या मनावर रुजविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सुरुवातीपासूनच प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांपर्यंत कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेचे महत्व पोहचावे व दररोज नियमित वर्गीकरण कऱण्याविषयी पाल्यांमार्फत त्यांना सांगितले जावे यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे.
अशाच प्रकारचा शालेय स्तरावरील एक अभिनव उपक्रम ‘ड्राय वेस्ट बँक’ शिर्षकांतर्गत बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या संकल्पनेतून बेलापूर विभागातील 3 शाळांमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आपल्या घरातील सुका कचरा वेगळा ठेवण्याची सवय लागावी व कचरा वर्गीकरणाचे महत्व स्वकृतीतून पटावे यादृष्टीने त्यांनी प्लास्टिक बॉटल, चीप्स अथवा चॉकलेटचे कव्हर, टेट्रापॅक अथवा टिन, काचेच्या बाटल्या, घरगुती प्लास्टिक आठवड्यातून एक दिवस शाळेत जमा करावयाच्या आहेत.
त्यांनी जितक्या प्रमाणात या वस्तू जमा केल्या त्या प्रमाणात त्यांना पॉईंट्स देण्यात येत असून ते पॉईंट्स नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ड्राय वेस्ट पासबुक’ देण्यात आलेले आहे. या पासबुकमध्ये वर्गशिक्षकांमार्फत त्यांनी जमा केलेल्या सुक्या कच-याच्या प्रमाणात देण्यात येणारे पॉईंट्स नोंदवून ठेवण्यात येत आहेत. प्रत्येक 100, 200, 500 पॉईंट्स जमा झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
अशाच प्रकारचे जास्तीत जास्त पॉईंट्स मिळविणा-या नमुंमपा शाळा क्र. 3 आग्रोळी येथील 34 विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या पॉईंट्सच्या प्रमाणात वही, पेन, कंपासपेटी, अशा प्रकारच्या शालोपयोगी वस्तूंचे वितरण घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या शुभहस्ते, बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती, स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन, मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील 57 विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. नुकत्याच सुरु झालेल्या या अभिनव उपक्रमांतर्गत 3 वेळा सुका कचरा जमा करण्यात आला असून साधारणत: 327 किलो सुका कचरा जमा करण्यात आला आहे.
जमा झालेले प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वतंत्रपणे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेला जाऊन तेथील ड्राय वेस्ट कलेक्शन पॉई्ट्स येथे जमा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे 2000 पॉईंट्स प्राप्त करणा-या उत्कृष्ट विद्यार्थ्यास ‘वेस्ट वॉरियर’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
विद्यार्थीदशेपासूनच नवी मुंबईतील मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या मनावर नकळतपणे कचरा वर्गीकरणाचे संस्कार व्हावेत व शाळेतील मूल्य संस्कारांमध्ये स्वच्छतेच्या संस्काराचाही समावेश व्हावा यादृष्टीने हा ‘ड्राय वेस्ट बँक’ उपक्रम अत्यंत आगळा वेगळा असून निश्चय केला – नंबर पहिला हा निर्धार साध्य करण्यासाठी या उपक्रमाला शाळेतील मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांचेही प्रोत्साहक योगदान मिळत आहे.
Published on : 15-12-2022 13:47:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update