एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधासाठी विभागवार विशेष मोहिमा
स्वच्छता विषयक कामांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापर होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक विरोधातील मोहिमा तीव्र करण्यात आल्या तसेच ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी व्यावसायिक व नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे बाजाराची ठिकाणे येथे जनजागृती करताना प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून वापरावयाच्या कापडी पिशव्यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले.
1 डिसेंबरपासून 8 विभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी पथकांमार्फत केलेल्या कारवाईत 24 व्यावसायिकांकडून 1 लाख 20 हजार इतकी दंडात्मक रक्कम तसेच 1595.30 कि.ग्रॅ. इतके प्रतिबंधात्मक पिशव्या व प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये बेलापूर विभागात 2 व्यावसायिकांकडून रु.10 हजार दंड व 10 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. अशाच प्रकारे नेरुळ विभागात 2 व्यावसायिकांकडून रु.10 हजार दंड व 1.3 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा, वाशी विभागात 2 व्यावसायिकांकडून रु.10 हजार दंड व 2 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा, तुर्भे विभागात 5 व्यावसायिकांकडून रु.25 हजार दंड व 1550 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा, कोपरखैरणे विभागात एका व्यावसायिकाकडून रु.5 हजार दंड व 1 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा, घणसोली विभागात एका व्यावसायिकाकडून रु. 5 हजार दंड व 10 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा, ऐरोली विभागात 9 व्यावसायिकांकडून रु.45 हजार दंड व 11 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा आणि दिघा विभागात 2 व्यावसायिकांकडून रु.10 हजार दंड व 10 कि.ग्रॅ. प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय परिमंडळनिहाय नेमलेल्या 2 भरारी पथकांकडून 8 व्यावसायिकांकडून रु.45 हजार इतका दंड तसेच 463.80 कि.ग्रॅ. इतका प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे 1 डिसेंबरपासून 31 व्यावसायिकांवर पहिला गुन्हा असल्याने रु.5 हजार दंड़ात्मक रक्कम तसेच तुर्भे विभागातील एका व्यावसायिकाकडून दुसरा गुन्हा असल्याने रु.10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण रु.1 लाख 65 हजार इतकी दंडात्मक रक्कम तसेच 2059.10 कि.ग्रॅ. इतक्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
दैनंदिन जीवनातून प्लास्टिकला हद्दपार करणे ही पर्यावरणशील भविष्याची गरज असून त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन विविध माध्यमांतून नागरिकांना करण्यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिक शोध मोहिमा राबवून प्लास्टिक वापर आढळल्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपल्या व निसर्गाच्या भल्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: बंद करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 20-12-2022 11:58:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update