‘फिश फीड’ या अत्याधुनिक प्रकल्पव्दारे प्रायोगिक स्वरूपात दिवाळे मार्केटमध्ये मासळीच्या कच-यावर प्रभावी उपाययोजना
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त केल्यानंतर हे मानांकन ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये उंचावण्यासाठी नवी मंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला जात असून अशाच प्रकारचा ‘फिश फीड’ हा एक अभिनव उपक्रम दिवाळेगाव मार्केट येथे प्रायोगिक स्वरूपात राबविला जात आहे.
विविध प्रकारच्या कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जात असताना मासळी मार्केट मधील कचरा हा देखील एक वेगळा व महत्वाचा भाग असून मासळी मार्केटमधील कच-यावर अत्याधुनिक पध्दतीने प्रक्रिया करुन त्यापासून मत्स्य खादय तयार करण्याचा अत्यंत आधुनिक असा फिश फीड प्रकल्प दिवाळेगाव येथील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविला जात आहे.
अशा प्रकारचे मासळीच्या कच-यावरील प्रक्रिया प्रकल्प देशातील काही मोठ्या शहरांतील खाजगी संस्थांमध्ये राबविले जात आहेत. मात्र ‘फिश फीड’ हा मासळी मार्केटमधील कचरा विल्हेवाटीचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून कार्यान्वित प्रकल्प हा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविला जाणारा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आणखी एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आरंभ करण्यामध्ये देशात अग्रणी ठरली आहे.
फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेचा वतीने एक टन क्षमतेचा हा फिश फीड प्रकल्प दिवाळेगाव मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात कार्यान्वित करण्यात आला आहे व याविषयीचा सामंजस्य करार महानगरपालिका आणि संस्थेमध्ये झालेला आहे.
200 किलो मासळीच्या कच-याची एक बॅच अशा दिवसभरात पाच बॅचेस ही या प्रकल्पाची क्षमता असून या प्रक्रियेमध्ये मार्केटमध्ये निर्माण होणारा मासळीचा कचरा एकत्रित करुन यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अत्यंत बारीक केला जाणार आहे व त्यानंतर त्याचे द्राव्य स्वरुपातील मत्स्य खादय म्हणून रुपांतर करण्यात येणार आहे. या कार्यवाहीकरिता मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्या महिलांचे विशेष सहकार्य लाभणार असून तेथील महिला बचत गटांमधील दोन महिलांना याठिकाणी रोजगारही उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून त्यांचेही सक्षमीकरण होणार आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यापासून ते हा प्रकल्प कार्यान्वीत राखण्याची संपूर्ण जबाबदारी फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेने उचलली असून नवी मुंबई महानगरपालिकेसोबत तशा प्रकारचा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकार अंगिकृत भारतीय कृषि अनुसंधान परिषद (Indian Council of Agriculture Research) यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या तंत्रज्ञानानुसार फिश फीड हा प्रकल्प फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत दिवाळे गावातील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविण्यास सुरुवात करण्यात आलेली असून येथील यशस्वीतेनंतर टप्प्प्याटप्प्याने इतरही मासळी मार्केटमध्ये ही कार्यप्रणाली राबविण्याचे नियोजन आहे. याठिकाणी 50 किलोच्या ट्रायल बॅच मधून निर्माण झालेले द्राव्य स्वरुपातील मत्स्य खादय तपासणीकरीता आयसीएआरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे.
सदर प्रकल्पाचा संपूर्ण खर्च फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेमार्फत केला जात असून महानगरपालिकेचा यामध्ये कोणताही निधी खर्च होत नाही. या प्रकल्पामुळे मासळी मार्केटमधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळापर्यंत वाहून न्यावा लागणारा कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया होणार असल्याने तो वाहून न्यावा लागणार नाही व त्यामुळे कचरा संकलन व वाहतूक खर्चात बचत होणार आहे. तसेच मोठया प्रमाणावर कचरा निर्माण होत असलेल्या ठिकाणच्या कच-यावरील प्रक्रिया त्याच ठिकाणी केली जावी या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीतील नियमाचीही अंमलबजावणी होणार आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून काही महिलांनाही रोजगार उपलब्ध होणार असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही या प्रकल्प उपयोगी आहे.
अशा प्रकारे स्वच्छता कार्यात नवनवीन संकल्पना राबवित नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूकतेने काम करीत असून स्वच्छता कार्यात बदलत्या जगाचा अदमास घेत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. फिश फीड सारखा अभिनव प्रकल्पही आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील एक महत्वाचा आणि नाविन्यपूर्ण असा बहुपयोगी उपक्रम आहे.
Published on : 27-12-2022 10:25:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update