‘झिरो वेस्ट इव्हेन्ट’ व्दारे स्वच्छता विषयक जागरुकतेचे दर्शन
घनकचरा व्यवस्थापनाच्या ‘थ्री आर’ संकल्पनेमध्ये ‘रिड्युस’ अर्थात कमीत कमी कचरा निर्माण करणे हा एक महत्वाचा भाग असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांमध्ये कच-याची कमीत कमी निर्मिती करून तो उपक्रम ‘शून्य कचरा उपक्रम’ म्हणून आयोजित केला जाणे ही एक महत्वपूर्ण बाब आहे.
स्वच्छ सर्वेक्षणातील या महत्वाच्या गोष्टीकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून नागरिकांनी आपले विविध समारंभ, कार्यक्रम हे शून्य कचरा उपक्रम म्हणून राबवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
शून्य कचरा तत्वाचा अंगिकार करत नवी मुंबई महानगरपालिकेतून या महिन्यात सेवानिवृत्त होत असलेल्या श्री. भरत देशमुख व श्री. देवेंद्र ब्राम्हणे या 2 कर्मचा-यांनी आपल्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम हा शून्य कचरा उपक्रम (Zero Waste Event) राबविला.
या कार्यक्रमात जेवणाकरिता काचेच्या प्लेट्सचा तसेच स्टिलच्या चमच्यांचा वापर करण्यात आला. सजावटीकरिता रंगीत कागद, कापड आणि फलकांकरिता कार्डबोर्डचा वापर करण्यात आला. पाणी व सरबत पिण्याकरिता बायोडिग्रेडेबल इकोफ्रेन्डली ग्लासचा तसेच उपस्थितांना रिटर्न गिफ्टही पेपर बॅग व रिसायकल पध्दतीने निर्माण केलेल्या डाय-या आणि सीड पेन्सिल यांचे देण्यात आले.
कार्यक्रमानंतर उरलेले अन्न गरीब गरजूंना वाटप करण्यासाठी शेल्टर ग्रुप या सेवाभावी संस्थेकडे देण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याकरिता हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन स्वतंत्र कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या कचरा कुंड्यांवर माझा कचरा माझी जबाबदारी हे घोषवाक्य ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच वॉश बेसिन जवळ पाणी वाचवा असा संदेशही नजरेत भरेल अशा ठिकाणी लावण्यात आला होता.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आवर्जून उपस्थित रहात सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या तसेच स्वच्छतेविषयी जागरुकता दाखवून सेवानिवृत्ती स्नेहसंमेलन शून्य कचरा उपक्रम म्हणून साजरे केल्याबद्दल कौतुक केले. याप्रसंगी बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई हे स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला देशातील तृतीय क्रमांकाचे आपले मानांकन उंचाविण्यासाठी समर्थपणे सामोरे जात असताना नागरिकांनी जागरूकतेने आपले विविध प्रकारचे समारंभ, कार्यक्रम शून्य कचरा उपक्रम म्हणून राबवून स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 28-12-2022 13:10:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update