*सानपाडा उड्डाणपूलाखाली पडीक जागेचा कायापालट करीत लोकोपयोगी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी*



शहर स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून दुर्लक्षित पडीक जागांचा कायापालट केला जात आहे. अशाच प्रकारची ‘स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ ही अभिनव संकल्पना सेक्टर 15, सानपाडा येथील उड्डाणपुलाखाली राबविण्यात आली असून जागेच्या सुशोभिकरणाप्रमाणेच ही जागा विविध क्रीडा प्रकारांसाठी उपयोगात आल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शविली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सानपाडा भागातील सेक्टर 15 येथील उड्डाणपूल हा नागरी वस्तीतील उड्डाणपूल असून त्याखालील जागेवर कचरा, डेब्रीज टाकले जात असल्याने येथील वातावरण अस्वच्छ होते. त्याचप्रमाणे त्या जागेचा असामाजिक कारणांसाठी गैरवापर होत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून ही जागा सुशोभित करण्याची सातत्याने मागणी केली जात होती.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत या जागेचे सुशोभिकरण करून तिचे सुव्यवस्थित रुपांतर करताना ही जागा विविध गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीने याठिकाणी विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्या जागेचा लोकोपयोगी कायापालट करण्याचे नियोजन केले.
त्या अनुषंगाने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण करताना उड्डाणपूलाखालील 2745.27 चौ.मी. जागेमध्ये जमिनीपासून उड्डाणपूलाच्या उंचीनुसार सुयोग्य खेळांची निवड करण्यात आली व त्या जागेचे खेळांनुसार झोन करण्यात आले. ज्याठिकाणी उंची जास्त आहे अशा झोनमध्ये बास्केटबॉल कोर्ट व बॅडमिंटनचे 3 कोर्ट निर्माण करण्यात आले. त्याचप्रमाणे 22 यार्डचे पीच असलेला बॉक्स क्रिकेटचा झोन तयार करण्यात आला. तसेच 30.61 X 14.00 मी. आकाराची स्केटींग रिंक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय योगसाधना करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यासोबतच या स्पोर्ट्स कोर्ट्सच्या परिसरात जॉगींग ट्रॅक विकसित करण्यात आला.
या सोबतच ज्येष्ठ नागरिक व इतरांना विरंगुळ्याचे साधन म्हणून त्याठिकाणी परिसर सुशोभिकरण करून बसण्यासाठी बेंचेसची सुविधा करण्यात आली. यासोबतच ॲम्फी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भागात उड्डाणपुलाखाली आकर्षक रंगसंगतीने डोळ्यात भरतील असे चित्रांकन करण्यात आले.
उड्डाणपूलाखालील पडीक जागेचे अशा प्रकारे क्रीडा सुविधांनीयुक्त सुशोभित परिवर्तन करण्यात आल्याने नागरिकांना एक उत्तम सुविधा उपलब्ध झाली असून ते आरोग्य हिताच्या दृष्टीनेही लाभदायी ठरणार आहे. आगामी काळात अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित नवी मुंबईच्या सुशोभिकरणात व सुविधांमध्ये लक्षवेधी भर घातली जाणार आहे.
Published on : 29-12-2022 15:11:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update