स्त्रियांना योग्य सन्मान देत समानतेचा पुरस्कार ही सावित्रीबाईंना आदरांजली – श्रीम. राही भिडे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार करणारे अतिशय समर्पक आणि अत्यंत भव्य असे बाबासाहेबांचे स्मारक नवी मुंबई महानगरपालिकेने उभारून खरी आदरांजली अर्पण केली असून विशेषत्वाने येथील ग्रंथालय पाहून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे स्मरण होते असे सांगत संपादिका, लेखिका श्रीम. राही भिडे यांनी सावित्रीबाई ही आमची अक्षरमाय नसती तर आज मी अशी आत्मविश्वासाने तुमच्यापुढे बोलायला उभीच राहू शकली नसते असे मत व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित ‘अक्षरवेध’ या विचार श्रृंखलेअंतर्गत ‘सावित्रीबाईंच्या वाटेवरून पुढे जाताना…’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी श्रीम. राही भिडे यांनी श्रोत्यांशी सुसंवाद साधला.
वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत महिलांच्या सामाजिक वाटचालीचा वेध घेत श्रीम. राही भिडे यांनी स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना न्याय व हक्क प्रदान केले असे सांगितले. पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहात व त्याच्यासोबत सामाजिक चळवळीत धडाडीने पुढाकार घेत सावित्रीबाई स्वत: तर शिकल्याच शिवाय त्यांनी इतर अनेक जणींना शिक्षणाचा विकासमार्ग दाखवला आणि स्वत: अवहेलना सोसून महिलांसाठी प्रगतीची वाट खुली केली. सावित्रीबाईंनी प्रबोधनात्मक, वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणा-या, निसर्गाचा वेध घेणा-या कविता लिहिल्या. आज एका बाजूला महिला विविध क्षेत्रात भरारी घेताना दिसताहेत पण प्रत्येक गांव ग्लोबल होत असताना महिलांचे प्रश्न मात्र तेच आहेत असे त्यांनी अनेक उदाहरणे देत सांगितले.
जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा स्त्रियांनी स्वत:ला सिध्द केले असून सर्वप्रथम गौतम बुध्दांनी स्त्रीला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. महात्मा फुले यांनी स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. मात्र रुढी – परंपरा यामध्ये अडकलेल्या पोषाखी आधुनिक दिसणा-या महिलांनी मात्र विचारांची आधुनिकता आचरणात आणलेली दिसून येत नाही हे चित्र अस्वस्थ करत असल्याचेही श्रीम. राही भिडे यांनी मत नोंदविले.
स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याचे वरकरणी दिसून येत असले तरी त्यांना निर्णय प्रक्रियेत भक्कम स्थान असल्याचे आढळत नाही असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. प्रसारमाध्यमांतून दाखविले जाणारे स्त्रियांचे दर्शन तिचा सर्वांगीण विकास दाखविणारे नाही हे स्पष्ट सांगत प्रसारमाध्यमात स्त्रियांच्या सत्व आणि स्वत्वापेक्षा तिच्या देहाला अधिक महत्व दिले जाते यापलिकडे जात तिच्या कर्तृत्वाची उंची दाखविली पाहिजे असे त्या म्हणाल्या. याकरिता स्त्रियांनीही स्वत:मध्ये बदल घडविण्याची गरज असल्याचे सांगत श्रीम. राही भिडे यांनी स्त्री - पुरुष शक्तीचा समान वापर झाला तरच देश महाशक्ती म्हणून पुढे येईल असे सांगितले.
आजच्या आधुनिक काळात सावित्रीबाईंचा पुरोगामी विचार घेऊन त्यांच्या वाटेवरून पुढे जाताना संविंधानिक समानतेची भूमिका स्विकारली पाहिजे व स्त्रियांना प्रत्येक बाबतीत योग्य तो मान दिला गेला पाहिजे हीच सावित्रीबाईंना खरी आदरांजली ठरेल असे विचार त्यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेली व्याख्यानांची परंपरा शहराच्या सांस्कृतिकतेमध्ये भर घालणारी असल्याचे सांगत संपादिका, लेखिका श्रीम. राही भिडे यांनी महानगरपालिकेच्या वैचारिक श्रीमंतीची प्रशंसा केली. व्याख्यानासाठी श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Published on : 03-01-2023 15:31:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update