नवी मुंबईत सर्वच विभागात जनसहभागातून स्वच्छतेचा जागर
स्वच्छतेमध्ये लोकसहभाग हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात असून या माध्यमातून नवी मुंबईत स्वच्छतेची चळवळ उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासोबतच नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत.
या सप्ताहभरात सेक्टर 11 नेरुळ येथील वाणिज्य क्षेत्रात तुलसी महिला बचत गट यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ज्यामध्ये परिसर स्वच्छता करून बचत गटाच्या महिलांनी तेथील व्यापा-यांसमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला. वाशी सेक्टर 17 येथील प्रभाग क्र. 63 मधील महाराजा मार्केटमध्ये तेथे भाजी व फळ विक्री करणा-या व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन मार्केटची स्वच्छता मोहीम राबविली. नेरुळ मधील रामलीला मैदानात कमांडो ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवित मैदान व परिसराची स्वच्छता केली. तसेच स्वच्छतेची शपथ घेत परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाविषयी व प्लास्टिक प्रतिबंधाविषयी जनजागृती केली.
नवी मुंबई महानगरपालिका आणि विथ देम फॉर देम या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली खाडी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन खाडी किनारा व खारफुटी सफाई करण्यात आली. वाशी रेल्वे स्टेशन लगतच्या ट्री बेल्टमध्येही विशेष स्वच्छता मोहीम राबवून दुर्लक्षित पडीक जागेत स्वच्छता करण्यात आली. अशाच प्रकारे बेलापूर विभागात सागर किनारी नवी मुंबई महानगरपालिकेसह एन्व्हायरमेंट लाईफ, आवाज फाऊंडेशन व डिवाईन फाऊंडेशन आणि एस आय ई एस कॉलेज नेरूळ यांनी एकत्रित सहयोगाने खाडी किनारा व परिसराची स्वच्छता केली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये ड्राय वेस्ट बँक ही अभिनव संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली असून त्याची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने बेलापूर विभागातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांची विशेष बैठक घेऊन त्यांना या संकल्पनेचे महत्व पटवून देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय वाढीस लागून नवी मुंबईच्या उद्याच्या नागरिकांना उमलत्या वयातच स्वच्छतेचे महत्व कळेल असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी मत मांडले. यावेळी ही संकल्पना मांडणा-या बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती उपस्थित होत्या. अशाच प्रकारची विशेष कार्यशाळा सेक्टर 8 बी सीबीडी बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन्स सोसायटीच्या शाळेत घेण्यात आली. त्याचप्रमाणे शाळा क्र. 29 व 110 वाशी सेक्टर 16 येथेही विद्यार्थ्यांना स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याविषयी प्रोत्साहित करण्यात आले.
अनेक वर्दळीच्या ठिकाणीही स्वच्छतेविषयीच्या जनजागृतीपर उपक्रमांवर भर देण्यात आला असून एसआयईएस महाविद्यालयाचे एनएनएस युनीट आणि जयश्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 40 नेरुळ येथील सीवूड ग्रॅड सेंट्रल मॉल याठिकाणी मॉलमध्ये येणा-या ग्राहकांमध्ये तसेच तेथील व्यावसायिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळण्यासाठी आवाहनही करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या उपस्थितीत जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कागदी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका व घरगुती घातक असे 3 प्रकारे वर्गीकरण कऱण्यात यावे, घरातील ओल्या कच-याचे शक्यतो घरातच कंपोस्ट बास्केट वापरून खत निर्मिती करावी. सोसायटी व वसाहतीच्या आवारात कंपोस्ट पिट्स उभारावेत, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: बंद करावा, स्रार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला प्रतिबंध असावा अशा विविध विषयांवर महानगरपालिका क्षेत्रात ठिकाठिकाणी जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आल्या. तसेच उपक्रम राबिवण्यात आले. यामध्ये ईश्वरनगर दिघा येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या परिसरात नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सिध्दीविनायक मंदिराजवळ प्र.क्र. 2 दिघा येथे जनजागृती करण्यात आली. गणपतीपाडा दिघा येथेही जनजागृती करण्यात आली. सेक्टर 18 रॉक गार्डन नेरुळ येथे ज्येष्ठ नागरिक समुहाच्या वतीने स्वच्छतेची शपथ घेऊन जनजागृती उपक्रम राबविला गेला.
रबाळे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा स्टँड आणि पार्किंग परिसर याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये या विषयी जनप्रबोधन करण्यात आले. सेक्टर 5 सानपाडा येथील नागरिकांच्या कार्यशाळेमध्ये स्वच्छतेच्या बाबींविषयी जनजागृती करण्यात आली. सेक्टर 5 ऐरोली येथील भास्कर घाडी मैदानातही परिसर स्वच्छतेसह जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली.
असे नानाविध उपक्रम राबवित नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये स्वच्छतेचा जागर केला जात असून निश्चय केला - नंबर पहिला हे ध्येय वाक्य साध्य करण्यासाठी नागरिकांच्या सक्रीय सहभागातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
Published on : 06-01-2023 13:40:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update