स्वच्छता कामगारांना सुट्टी देत 2800 हून अधिक नागरिकांनी केली बेलापूर विभागाची स्वच्छता
माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही ओळ केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न ठेवता आज बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत तेथील स्वच्छताकर्मींच्या दैनंदिन कामाचा सन्मान करण्यासाठी त्यांना सुट्टी दिली आणि स्वत: झाडूसह इतर स्वच्छता साधने हातात घेत रस्ते, गल्ल्या साफसफाई केली आणि स्वच्छतेचा नवा आदर्श स्वकृतीतून प्रदर्शित केला.
सकाळी 6.30 वाजल्यापासून बेलापूर विभागात ठिकठिकाणी नागरिक आपापल्या परिसरातील सफाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि 2800 हून अधिक नागरिकांच्या सहभागने जणू बेलापूर विभागात स्वच्छतेची व्यापक चळवळच उभी राहिली. यामध्ये तरूणाईची मोठी संख्या अत्यंत लक्षवेधी होती. वाशी विभागानंतर आज बेलापूर विभागानेही स्वच्छताकर्मींच्या सेवाभावी कामाविषयी आपुलकी व आस्था दाखवित त्यांच्या जागी स्वत: झाड़ू हातात घेतला आणि त्यांच्या कामाचा सन्मान केला.
याचवेळी बेलापूर विभागातील स्वच्छताकर्मींसाठी बेलापूर विभाग कार्यालयाच्या बेलापूर भवन इमारतीत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील क्रोमा समोरील मैदानात 325 हून अधिक स्वच्छताकर्मींनी एकत्र येत सेक्टर 11 येथील बेलापूर भवन पर्यंत स्वच्छता रॅली काढली आणि स्वच्छतेविषयीचा प्रचार केला. कचरा वर्गीकरणाचे महत्व, प्लास्टिक प्रतिबंधाची गरज, ओल्या कच-याची कम्पोस्ट बास्केट वापरून घरच्या घरी अथवा सोसायटीच्या आवारात कम्पोस्ट पीट्सव्दारे विल्हेवाट अशा स्वच्छताविषयक अनेक महत्वाच्या गोष्टींविषयी फलक उंचावत तसेच मोठ्याने घोषणा देत या स्वच्छताकर्मींना परिसर दणाणून सोडला.
महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती यांचेसह सुयोग्य नियोजन केले. मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे तसेच स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांनी स्वच्छता निरीक्षक सर्वश्री विजय नाईक, मिलींद तांडेल, किरण सोळसकर, पवन कुवे यांनी सर्व सहकारी तसेच स्वच्छता कामातील पर्यवेक्षक यांना एकत्र घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. परिमंडळ 1 विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील विविध स्वयंसेवी संस्था, स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक, लोकप्रतिनिधी, शाळा – महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थी, मॉल्स हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे मालक व कर्मचारी हे सर्वजण या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने एकत्र आल्याने व्यापक लोकसहभागातून एक भव्यतम आणि स्वच्छताकर्मींविषयी आपुलकीची भावना प्रदर्शित करणारा आगळावेगळा उपक्रम यशस्वीरित्या साकार झाला.
'स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, आजचा दिवस स्वच्छताकर्मींच्या सन्मानाचा', म्हणत बेलापूर विभागातील नागरिकांनी आज स्वच्छताकर्मींचे काम स्वत: करून त्यांच्या कामाचा अनुभव घेतला आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
अशा प्रकारे स्वच्छताकर्मींचा सन्मान करण्यासोबतच 325 हून अधिक स्वच्छताकर्मींची बेलापूर विभाग कार्यालय येथे विशेष शिबीर लावून आरोग्य तपासणी करण्यात आली. हार्ट फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. ईलीस जयकर यांच्या सहयोगाने, मेडिकव्हर हॉस्पिटल व ड्रीम ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात स्वच्छताकर्मींची रक्तदाब तपासणी, मधुमेहासाठी रक्ततपासणी, बी.एम.डी. तपासणी, नेत्रतपासणी, ई.सी.जी. तसेच दंतचिकित्सा अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
'निश्चय केला, नंबर पहिला' या ध्येयवाक्याच्या अनुषंगाने 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' ला समर्थपणे सामोरे जात असताना लोकसहभागाला विशेष महत्व दिले जात वाशी विभागानंतर आज बेलापूर विभागातील तब्बल 2800 हून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत संपूर्ण विभाग स्वच्छ केला आणि स्वच्छताकर्मींना सुट्टी देत त्यांचा आगळ्यावेगळ्या पध्दतीने सन्मान केला.
Published on : 14-01-2023 14:08:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update