*लिडार तंत्रज्ञानाव्दारे मालमत्ता सर्वेक्षण कार्यवाहीला जलद पूर्ण कऱण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश*

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या लिडार तंत्रज्ञानाव्दारे सुरु असलेल्या सर्वेक्षण कामाला गती देऊन सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्तांची माहिती मालमत्ता कर विभागाकडे त्वरित हस्तांतरीत करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी संबंधित एजन्सीला दिले. तसेच ही कार्यवाही तत्परतेने करून घेण्यासाठी अभियांत्रिकी विद्युत विभागाने सतर्क रहावे तसेच मालमत्ता कर विभागानेही माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.
लिडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेताना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सिडको विकसित नागरी क्षेत्र, गावठाण, झोपडपट्टी अशा भागांप्रमाणेच एमआयडीसी क्षेत्रातील सर्वेक्षण कार्यवाहीचा बारकाईने आढावा घेतला. या सर्वेक्षणात 360 डिग्रीमध्ये विस्तीर्ण सर्वेक्षण होत असून मोबाईल मॅपींग सिस्टीम वापरून पायाभूत पातळीवर प्रतिमा संपादित केली जात आहे. या पायाभूत सर्वेक्षणासोबतच महानगरपालिका क्षेत्राचा बेसमॅप अद्ययावत केला जात असून इन्टीग्रेशनही केले जात आहे. ड्रोनव्दारे सर्वेक्षण व प्रत्यक्ष जागी जाऊन सर्वेक्षण अशा दोन्ही प्रकारे सर्वेक्षण होत असल्याने यामध्ये जास्तीत जास्त अचूकता असावी याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड व संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांमध्ये देखील वाढ तसेच बदल झालेले आहेत. लिडारसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणा-या सर्वेक्षणाव्दारे जास्तीत जास्त अचूक माहिती महानगरपालिकेस प्राप्त होणार असून महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या सद्यस्थितीची अद्ययावत माहिती महानगरपालिकेस उपलब्ध होणार आहे.
यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वाधिक महत्वाचा स्त्रोत असणा-या मालमत्ता कराच्या उत्पन्नात भर पडणार असून यामधून गुणवत्तापूर्ण नागरी सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिकेस निधी उपलब्ध होणार आहे. यादृष्टीने हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे असून सर्वेक्षणाची कार्यवाही अधिक गतीमान करावी व 31 जानेवारीपर्यंत सर्वाधिक मालमत्तांची माहिती मालमत्ता कर विभागास उपलब्ध करून द्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
Published on : 20-01-2023 11:34:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update