नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा जल्लोषात संपन्न
नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा जल्लोषात संपन्न
खेळाडू म्हणून आपण जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा खिलाडूवृत्ती, सांघिक भावना वाढीस लागते व आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतो असा स्वानुभाव कथन करीत ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणून नावाजल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय धावपटू श्रीम. ललिता बाबर यांनी समर्पित भावनेने झोकून देऊन खेळताना आपल्याला दुखापत होऊन आपली क्रीडा कारकीर्द वाया जाणार नाही याचीही प्रत्येकाने काळजी घ्यावी असे सांगितले.
नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या वतीने राजीव गांधी क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ जागतिक पातळीवर देशाचे नाव गाजविणा-या धावपटू श्रीम. ललिता बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कोकण विभागीय नगररचना विभागाचे सहसंचालक श्री.जितेंद्र भोपळे, एमएमआरडीएच्या उपसंचालक श्रीम. ज्योती कवाडे, नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कोकण विभागाचे नगररचनाकार श्री. राजेंद्रसिंग चव्हाण तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे नगररचनाकार तथा क्रीडा स्पर्धा समन्वयक श्री. सोमनाथ केकाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोकण विभाग नगररचना सहसंचालक श्री. जितेंद्र भोपळे यांनी शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने या स्पर्धांचे महत्व विषद करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कोकण विभागातील कोकण भवनसह रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, सिंधूदुर्ग, पालघर तसेच यजमान नवी मुंबई महानगरपालिका अशा 8 संघांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. क्रिकेट, व्हॉलीबॉल, धावणे, बुध्दीबळ, बॅडमिंटन, कॅरम, बास्केटबॉल, टेबल टेनीस अशा 8 क्रीडा प्रकारांमध्ये नगररचना विभागातील 260 हून अधिक अधिकारी, कर्मचारी खेळाडूंनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे गोट्या, विटीदांडू, भोवरा अशा पारंपारिक खेळांचीही सुविधा याठिकाणी उपलब्ध असल्याने अनेकांनी शाळेचे दिवस आठवल्याचे सांगितले.
नगररचाना अधिकारी, कर्मचा-यांच्या अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन देणारा उत्तम उपक्रम – श्रीम. सुमा शिरूर
विविध क्रीडाप्रकारांतील पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या नेमबाजी क्रीडा प्रकारात ऑलंपिकसह आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचाविणा-या रायफल शुटींगपटू श्रीम. सुमा शिरूर यांनी नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या अंगभूत क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळांच्या स्पर्धांबद्दल नगररचना व मूल्य निर्धारण विभागाचे कौतुक केले.
नगररचना संचालनालय पुणे संचालक श्री. अविनाश पाटील यांनी या स्पर्धांमुळे अधिकारी, कर्मचारी यांना स्वत:च्या क्षमता सिध्द करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असल्याचे कथन करीत या माध्यमातून परस्परांमध्ये साघिक भावना निर्माण होत असल्याचे सांगितले व मोठ्या संख्येने सहभागाबद्दल अभिनंदन केले.
नगररचना विभागाच्या संचालक तथा नगरविकास विभागाच्या सहसचिव श्रीम. प्रतिभा भदाणे यांनी कोकण विभागाने ज्या दिमाखदार पध्दतीने आयोजन केले त्याची प्रशंसा करीत एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित आहोत अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी नगरविकास विभागाचे उपसचिव श्री. विजय चौधरी, नगररचना उपसंचालक श्रीम. कर्वे व श्रीम. ज्योती कवाडे, कोकण विभागीय सहसंचालक श्री. जितेंद्र भोपळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या समस्त मान्यवरांच्या शुभहस्ते विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना चषक, पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
क्रिकेट स्पर्धेत नगररचना विभागाच्या पालघर संघाने सिंधूदुर्ग संघावर मात करीत विजेतेपदाचा चषक पटकाविला. पालघर संघातील तय्यब यांनी मालिकावीर पारितोषिक तसेच सिंधूदुर्ग संघातील प्रितम यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाज व पालघर संघातील स्वप्नील यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाज पारितोषिके पटकाविली.
व्हॉलीबॉल स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ विजेतेपदाचा मानकरी ठरला. रत्नागिरी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
बॅडमिंटन स्पर्धेत 40 वर्षाखालील पुरुषांमध्ये रत्नागिरी संघातील अजय यादव व महिलांमध्ये मुंबई संघातील दिपाली साळवी तसेच 40 वर्षावरील पुरुषांमध्ये मुंबई संघातील किरण मलगांवकर व महिलांमध्ये पालघर संघातील अनिता वालेकर प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.
टेबल टेनिस स्पर्धेमध्ये 40 वर्षाखालील पुरुषांमध्ये पालघर संघातील निखील पाटील व महिलांमध्ये सिंधूदुर्ग संघातील प्राजक्ता गावडे विजेते पदाचे मानकरी ठरले.
बुध्दीबळ स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाच्या संघातील संदीप म्हात्रे तसेच महिलांमध्ये मुंबई संघातील आदिती व्हावकर यांनी सर्वप्रथम क्रमांक मिळविला.
कॅऱम स्पर्धेमध्ये ठाणे संघातील राजेंद्र पवार यांनी पुरुषांमध्ये तसेच ठाणे संघातील श्रीम. अश्विनी धामापुरकर यांनी महिलांमध्ये विजेतेपदाची बाजी मारली.
धावणे (4 X 100) 40 वर्षांवरील पुरुषांमध्ये कोकण विभागाच्या संघातील अजित न्यायनवरे, चंद्रकांत राजे, राजेंद्र मराठे, धरा सावंत यांनी तसेच महिलांमध्ये मुंबई संघातील उर्मिला खैरनार, आकांक्षा आव्हाड, अदिती नावेकर, स्मिता काजळे यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकाविली.
धावणे (4 X 100) 40 वर्षांखालील पुरुषांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाच संघ विजेता ठरला.
40 वर्षावरील 200 मीटर धावणे स्पर्धेत मुंबई संघातील विशाल रामगुडे तसेच 40 वर्षाखालील 200 मीटर धावण स्पर्धेत सिंधूदुर्ग संघातील कृष्णा यगुळे आणि 200 मीटर धावणे महिला विशेष स्पर्धेत उर्मिला खैरनार सर्वोत्तम क्रमांकाचे मानकरी झाले.
सुर्यनमस्कार स्पर्धेत ठाणे संघातील श्रीम. काजळे व श्री. पाटील तसेच कोकण विभाग संघातील श्री. सावंत विजेते ठरले.
स्किपिंग स्पर्धेत पुरुषांमध्ये ठाणे संघातील प्रतिक कदम यांनी व महिलांमध्ये मुंबई संघातील आदिती व्हावकर यांनी बाजी मारली.
सांस्कृतिक उपक्रम सहभागातून कर्मचा-यांची तणावमुक्ती – नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर
नगररचना व मूल्य निर्धारण कोकण विभागाच्या वतीने आयोजित या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातील कलाप्रकारांचे सादरीकऱण विष्णुदास भावे नाट्यगृहात संध्याकाळच्या सत्रात सादर झाले. याप्रसंगी नगररचना विभागाच्या कोकण विभागातील आठही कार्यालयांतील कलावंत अधिकारी, कर्मचारी यांनी गायन, नृत्य, नाट्य व कविता सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी उपस्थित नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अशाप्रकारे क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमधून अधिकारी, कर्मचा-यांना नेहमीच्या कार्यालयीन कामांपलिकडे जाऊन स्वत:मधील गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळते तसेच यामधून तणावमुक्ती होते असे सांगत अतिशय उत्तम रितीने उपक्रम आयोजन केल्याबद्दल कोकण विभागाचे सहसंचालक श्री. जितेंद्र भोपळे व नगररचनाकार श्री. राजेंद्रसिंग चव्हाण तसेच या संपूर्ण आयोजनात अत्यंत महत्वाची समन्वयक भूमिका बजावणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे नगररचनाकार श्री. सोमनाथ केकाण आणि सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.
विशेष म्हणजे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ‘लाजून हासणे अन् हासून ते पाहणे’ हे सुप्रसिध्द गाणे गात या अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या आनंदात स्वररंग मिसळला. नगररचना संचालनालय, पुणे संचालक श्री. अविनाश पाटील तसेच नगररचना संचालक तथा नगरविकास विभागाच्या सहसचिव श्रीम. प्रतिभा भदाणे यांनीही सुरेल गीत सादरीकरण केले.
अत्यंत नियोजनबद्धरित्या संपन्न झालेल्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे कौतुक करीत नवी मुंबई महानगरपालिकेचे नगररचनाकार तसेच या महोत्सवाचे समन्वयक श्री. सोमनाथ केकाण यांनी आभार प्रदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांनी तसेच नगररचना विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपक्रमाचे यजमानपद भूषविताना आयोजनात महत्वाचे योगदान दिले.
Published on : 20-01-2023 12:12:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update