नमुंमपा परिवहन उपक्रमाचा 27 वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा
प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याची बांधिलकी जपत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असल्याने एनएमएमटी प्रवासी सेवेबद्दल नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना असून यापुढील काळात उपक्रम अधिक उत्तम कामगिरी पार पाडेल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे आयोजित वर्धापनदिन समारंभात मनोगत व्यक्त करताना त्यांनी एनएमएमटी कर्मचा-यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी श्रीम. करिष्मा नायर, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. जितेंद्र इंगळे, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौंडकर, उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, श्रीम. मंगला माळवे, श्री. अनंत जाधव तसेच सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता श्री. प्रविण गाडे, कार्यकारी अभियंता श्री. विवेक अचलकर, मुख्य वाहतुक अधिकारी श्री. अनिल शिंदे, प्रशासन अधिकारी श्रीम. दिपिका पाटील, वाहतुक अधिक्षक श्री. सुनिल साळुंखे व श्री. उमाकांत जंगले आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी 27 वर्षांपूर्वी 1996 मध्ये 25 बसेसपासून सुरु झालेला परिवहन उपक्रमाचा प्रवास आता 27 वर्षाच्या कालावधीत 600 बसेसपर्यंत पोहचलेला आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. परिवहन उपक्रम स्वत:च्या पायावर उभा रहावा यादृष्टीने उपक्रमाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी यापुढील काळात प्रयत्न केले जात आहेत ही समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून नागरिकांनाच चांगली सेवा उपलब्ध होणार आहे याचाही आनंद त्यांनी व्यक्त केला.
परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर यांनी उपक्रमातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी एनएमएमटी परिवाराचा हक्काचा सदस्य असल्याची भावना व्यक्त करीत आपण एकमेकांच्या सहयोगाने काम करतो त्यामुळे केंद्र सरकारमार्फत 15 व्या अर्बन मोबॅलिटी इंडिया उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला देशातील सर्वोत्तम वाहतुक सेवेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. उपक्रमाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचे सारे श्रेय सेवाभावी वृत्तीने काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना देत श्री. योगेश कडुसकर यांनी यापुढील काळात असेच चांगले काम करून परिवहन उपक्रमाचा नावलौकीक उंचावत नेऊया असे आवाहन केले.
27 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कऱण्यात आलेल्या एनएमएमटी अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला.
पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत तुर्भे आगार अभियांत्रिकी संघ विजयाचा मानकरी ठरला तसेच तुर्भे आगार वाहक संघाने उपविजेतेपद मिळविले. महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत घणसोली आगार वाहक संघ विजेते पदाचा तर एनएमएमटी प्रशासन विभाग संघ उपविजेते पदाचा मानकरी ठरला.
पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत आसुडगांव आगार वाहक संघाने विजेतेपद पटकाविले. तसेच तुर्भे आगार अभियांत्रिकी वाहक संघाने उपविजेतेपद मिळविले. महिलांच्या कबड्डी स्पर्धेत घणसोली आगार वाहक संघ विजेते पदाचा तर आसुडगांव आगार वाहक संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धांतील उत्तम कामगिरी करणा-या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले.
त्याचप्रमाणे कॅरम, बॅडमिंटन, बुध्दीबळ, धावणे 100 मी., धावणे 200 मी., या वैयक्तिक स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली.
त्यासोबतच दहावी, बारावी, पदविका, पदवी परीक्षेत 80 टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या परिवहन उपक्रमाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांना पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच विना अपघात सेवा करणारे चालक, विना गैरहजेरी सेवा करणारे वाहक व चालक तसेच कमीत कमी रजा उपभोगणारे वाहतुक नियंत्रक यांना गौरविण्यात आले. याशिवाय तुर्भे आगारामध्ये लागलेल्या आगीला रोखण्यासाठी अग्निशमन कारवाई कऱण्यासाठी येणा-या नमुंमपा अग्निशमन वाहनांच्या आधी तत्परतेने अग्निविमोचन कार्य करून समय सुचकता दाखविणा-या कामगारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
त्यासोबतच बसमध्ये सापडलेले प्रवाशांचे पैशाचे पाकिट कार्यालयात जमा करणा-या गुणवंत कामगारांनाही याप्रसंगी सन्मानीत करण्यात आले. जादा प्रवासी दंड वसूली करणा-या सहाय्यक वाहतुक निरिक्षकांना तसेच एका व्यक्तीला आत्महत्तेपासून परावृत्त करणा-या एनएमएमटी कर्मचा-यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच नियोजन विभागात व अभियांत्रिकी विभागात उत्तम काम करणा-या कर्मचा-यांनाही सन्मानीत करण्यात आले.
वर्धापन दिन समारंभात नमुंमपा परिवहन उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी नृत्य, गायन, नाट्य आदी सादरीकरण करीत अंगभूत कलागुणांचे उत्साही दर्शन घडविले. आपल्याच कलावंतांनी सादर केलेले सादरीकरण अनुभवत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
Published on : 23-01-2023 14:14:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update