‘शून्य प्लास्टिकचा प्रारंभ माझ्यापासून’ उपक्रमांतर्गत 5146 विद्यार्थ्यांनी जमा केले तुकड्यांच्या स्वरुपातील 962 किलो प्लास्टिक
‘शून्य कच-याचा प्रारंभ माझ्यापासून’ या नवी मुंबईतील शाळा-शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 32 शाळांतील 5146 विद्यार्थ्यांनी 8720 प्लास्टिक बाटल्यांमध्ये तब्बल 961 किलोहून अधिक वजनाच्या तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक संकलीत केले. या उपक्रमामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या शाळा आणि विद्यार्थ्यांचा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथील विशेष समारंभात गौरव करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिश आरदवाड यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
मुलांमध्ये लहान वयापासून स्वच्छतेसोबतच प्लास्टिकचे दुष्परिणाम त्यांना समजून प्लास्टिक प्रतिबंधाविषयी त्यांची मनोभूमिका तयार व्हावी यादृष्टीने शून्य प्लास्टिकची सुरुवात माझ्यापासून हा अभिनव उपक्रम राबविला जात असून या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बॉटल घेऊन त्यामध्ये चॉकलेट्सचे रॅपर, वेफर्सचे प्लास्टिक पॅकेट्स, दुधाच्या पिशव्या अथवा सॅशेचे कापलेले तुकडे, प्लास्टिकचे लहान लहान तुकडे जमा करावेत व ती बाटली पूर्ण भरल्यानंतर आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा करावी ही या उपक्रमाची कार्यपध्दती आहे.
यामध्ये इतरत्र फेकले जाणारे व सहजपणे दुर्लक्षित होऊ शकेल असे छोट्या छोट्या तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक विद्यार्थ्यांमार्फत जमा होऊन पर्यावरणाची संभाव्य हानी टाळली जात आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
या शाळा-शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत जमा होणा-या बाटल्या महानगरपालिकेकडे संकलीत केल्या जात असून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येत आहे. या कामी हार्ट फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. इलिस जयकर यांच्यामार्फत विशेष योगदान दिले जात असून त्याबद्दल त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
‘झिरो प्लास्टिक स्टार्ट्स विथ मी 2.0’ या उपक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रातील शाळांना गौरविण्यात आले. तसेच संपूर्ण नमुंमपा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या चार्टर्ड इंग्लिश स्कुल ऐरोली, ज्ञानपुष्प विद्यानिकेतन बेलापूर व सेंट ऑगस्टिन हायस्कुल नेरुळ या 3 शाळांना सन्मानीत करण्यात आले.
अशाच प्रकारे प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रातील शाळांमध्ये सर्वोत्तम विभागीय कामगिरी करणा-या प्रत्येक विभागातील एका विद्यार्थ्यास गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे साई होलीफेथ हायस्कुल कोपरखैरणे येथील रिचा पाटील, चार्टर्ड इंग्लिश स्कुल ऐरोली येथील वेदिका वाईरकर आणि टिळक इंटरनॅशनल स्कुल घणसोली येथील दियान कोटियन अशा 3 विद्यार्थ्यांना संपूर्ण नमुंमपा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची व प्लास्टिक प्रतिबंधाची सामुहिक शपथ ग्रहण केली.
यापुढील काळात या उपक्रमांमध्ये अधिक मोठ्या संख्येने शाळांचा सहभाग वाढवून विद्यार्थ्यांच्या मनावर प्लास्टिक प्रतिबंधाचा स्वकृतीतून संस्कार करण्याचा प्रयत्न ‘शून्य प्लास्टिकचा प्रारंभ माझ्यापासून’ या अभिनव उपक्रमाची व्याप्ती वाढवून केला जाणार असून यामध्ये नवी मुंबईतील शाळा व्यवस्थापनांनी पुढाकार घ्यावा व जास्तीत जास्त मुले या उपक्रमामध्ये सहभागी होतील यादृष्टीने कार्यवाही करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-01-2023 14:22:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update