जी.ए. कुलकर्णी यांचे साहित्य माणसाच्या भावभावनांचा वेध घेणारे विश्वव्यापी – श्रीम. मीनाक्षी पाटील, सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
जीएंचे साहित्य हे काहीसे गूढ धुक्यासारखे असून ते जितके दुर्बोध मानले जाते तितकेच ते प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत आपलेपणाचे आहे, त्यामुळे ते आपल्या अमूर्त भावभावनांचा अविष्कार करणारे विश्वव्यापी आहे अशा शब्दात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव चित्रकार, कवयित्री श्रीम. मीनाक्षी पाटील यांनी जीएंच्या साहित्यविश्वाचा मागोवा घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मराठी भाषागौरव करणारे अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सुप्रसिध्द साहित्यिक, कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘जीए : स्मरणखुणा’ या विशेष कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव चित्रकार, कवयित्री श्रीम.मीनाक्षी पाटील तसेच सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.वृषाली मगदूम यांनी जीएंच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
यावेळी बोलताना श्रीम. मीनाक्षी पाटील यांनी जी.ए. कुलकर्णी यांच्या साहित्याकडे बघताना मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांना दडपण येते, तिथे नवी मुंबई महानगरपालिकेसारखी एखादी संस्था जीएंच्या कथाविश्वावर विशेष कार्यक्रम आयोजित करते हेच अत्यंत लक्षवेधी असल्याचे सांगत या माध्यमातून आम्हा वक्त्यांना बोलायचे असल्याने जीएंच्या साहित्याकडे पुन्हा एकदा वळता आले, तसेच उपस्थित श्रोत्यांनाही जीएंच्या कथा वाचण्याचा मोह होईल व या माध्यमातून मराठी भाषेचा व साहित्याचा गौरव होईल असा विश्वास व्यक्त केला.
रंगांवर अत्यंत प्रेम असणारे जीए स्वत: चित्रकार होते. त्यामुळे त्यांच्या कथासंग्रहांची शीर्षकेही रंगांशी साधर्म्य सांगणारी असून त्यांच्या कथांमध्ये माणसे, प्राणी, पक्षी हे सहजपणे येतात, जगतात. निसर्गाशी साहचर्याची भारतीय मनोभूमिका जीएंच्या कथांमधून अभिव्यक्त होत असून जागतिक साहित्याचे विपुल वाचन करताना त्यांचे जगाकडे पाहण्याचे भान विकसित होत गेले. यातूनच एखाद्या घटनेकडे चोहोबाजूंनी पाहण्याची व त्याचे शब्दचित्र रेखाटण्याची किमया त्यांना साधली असून याचा प्रत्यय त्यांच्या कथांमधून येतो व त्या वाचताना आपण स्तिमित होऊन जातो अशा शब्दात जीएंच्या कथांचे वेगळेपण श्रीम. मीनाक्षी पाटील यांनी स्पष्ट केले. जीएंनी सर्वसामान्य माणसाचे जगणे वेगळ्या पध्दतीने आपल्यासमोर ठेवले त्यामुळे त्यांचे सर्व लेखन हे वेगळे तरीही आपलेपणाचे वाटते अशा शब्दात जीएंची थोरवी त्यांनी सांगितली.
साहित्यिक, कथाकार प्रा. वृषाली मगदूम यांनी जीएंच्या विविध कथांची कथानके मांडत त्यांच्या साहित्याचे वेगळेपण अधोरेखीत केले. 9 कथासंग्रह लिहिणा-या जीएंवर 20 हून अधिक पुस्तके आहेत यातूनच त्यांचे मोठेपण सिध्द होते असेही त्या म्हणाल्या. जीएंच्या कथा नियतीला शरण जाणा-या वरवर काहीशा क्लिष्ट वाटल्या तरी त्या मनाचा सखोल शोध घेणा-या व वाचकाला अंतर्मुख करणा-या असून अत्यंत सूक्ष्म मनोविश्लेषण करणा-या असल्याचे निरीक्षण त्यांनी विविध उदाहरणे देत नोंदविले.
जीएंनी सामान्य माणसाच्या संसारकथा लिहिल्या पण त्या अशा पध्दतीने की त्या वैश्विक उंची गाठणा-या ठरल्या, त्यांनी सामान्य माणसाची ताकद दाखविली असेही वेगळेपण प्रा. वृषाली मगदूम यांनी सांगितले. प्रत्यक्ष लोकांना भेटण्याच्या बाबत, लोकांमध्ये मिसळण्याच्या बाबत जीए प्रसिध्दीविन्मुख वाटले तरी ते अतिशय कुटुंबवत्सल होते हे त्यांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिकांमधून दिसून येते असे सांगताना त्यांनी जीएंच्या जीवनातील विविध प्रसंग कथन केले.
लेखन हे साधन आहे आणि साहित्याशी निष्ठा राखणे महत्वाचे हे मनाशी ठाम ठरवून जीएंनी कथालेखनाशी जुळलेली बांधीलकी कधी सोडली नाही व आपण लिहिलेला एकही शब्द बदलला जाऊ नये याबाबत ते अत्यंत आग्रही असत याची काही खुसखुशीत उदाहरणे प्रा. वृषाली मगदूम यांनी दिली. जीएंचा काही व्यक्तींशी असलेला पत्रव्यवहार हा साहित्याचा एक अनमोल ठेवा असून प्रसिध्दीपासून दूर राहिल्यामुळे व लोकांमध्ये फारसे न मिसळल्यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच वाचकांना कुतुहल राहिले व ते दंतकथा होऊन जगले असेही त्या म्हणाल्या.
जी.ए. कुलकर्णी यांच्यासारख्या वाचकप्रिय प्रचंड कुतुहल असणा-या मराठीतील अत्यंत लोकप्रिय साहित्यिकाच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यभरात विशेष कार्यक्रम घेतल्याचे दिसून येत नाही. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या साहित्यावर विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांना शब्दांजली अर्पण कऱणे ही लक्षणीय बाब असल्याचे दोन्ही व्याख्यात्यांनी आवर्जुन नमूद केले.
दि. 27 जानेवारी रोजी, सकाळी 11 वा., नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदाची ‘स्वकाव्यवाचन स्पर्धा’ संपन्न होत असून त्यानंतर स्वकाव्यवाचन स्पर्धेचा व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
Published on : 25-01-2023 08:29:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update