स्वच्छतेमधील अधिक उत्तम कामगिरीसाठी क्षमता उंचाविण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन प्रजासत्ताक दिनी नवे पर्व स्वच्छतेचे मांडत ग्रो विथ म्युझिकसह नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार








नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेमध्ये एक विशिष्ट उंची गाठल्याने आपल्या शहराबद्दलच्या अपेक्षा वाढल्या असून राष्ट्रीय पातळीवर उच्च अधिका-यांमध्ये होणा-या चर्चेतही नवी मुंबईच्या स्वच्छता उपक्रमांबाबत उत्सुकता व्यक्त केली जाते असे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपल्याबद्दलच्या अपेक्षा लक्षात घेऊन महापालिका कर्मचा-यांनी आपल्या दैनंदिन कामाचे मूल्यमापन केले पाहिजे व स्वत:च्या कामामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि नियमित स्वच्छता राखण्याचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे असे आवाहन केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छतेचे नवे पर्व उपक्रमांतर्गत सुसंवाद साधत स्वच्छ सर्वेक्षणविषयक कार्याला गती देण्याचे निर्देश दिले. महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये संपन्न झालेला हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून हजारो नागरिकांनी ऑनलाईन अनुभवला.
स्वच्छता कर्मचा-यांचा कृतज्ञ सन्मान
महानगरपालिकेच्या स्वच्छतेमधील सतत उंचाविणा-या मानांकनात येथील जागरूक स्वच्छताप्रेमी नागरिकांचा सिंहाचा वाटा असून त्यांचे आभार मानण्याप्रमाणेच शहर स्वच्छतेसाठी दररोज कार्यरत असणा-या स्वच्छताकर्मींप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशी भावना मांडली. त्यादृष्टीने या कार्यक्रमाप्रसंगी 8 विभागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालय स्वच्छता करणा-या 8 महिला स्वच्छता कर्मचा-यांचा तसेच अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रातील 8 सफाईमित्रांचा आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
स्वच्छ मंथन स्पर्धेतील तिस-या टप्प्यात बेलापूर विभाग मानकरी
स्वच्छतेचे कार्य करीत असताना आपण त्यामध्ये नेहमीच नाविन्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न केला असून लोकसहभागावर विशेष भर दिला आहे. याकरिता वॉर्ड पातळीवर स्वच्छता कार्याची निकोप स्पर्धा व्हावी व यामधून स्वच्छतेचे अधिक उत्तम काम व्हावे यादृष्टीने तिमाही स्वच्छ मंथन स्पर्धा घेतली जात असून या अनुषंगाने लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत. या स्पर्धेच्या दुस-या टप्प्यात उत्तम कामगिरी करीत फिरता चषक प्राप्त करणा-या बेलापूर विभागाने तिस-या टप्प्यातही आपल्या सर्वोत्तम कामगिरीची परंपरा कायम राखल्याने स्वच्छ मंथन 3.0 मधील तिस-या टप्प्याचे मानकरी बेलापूर विभागाला घोषित करीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते बेलापूर विभाग कार्यालयाला सन्मानित करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे यांच्या समवेत हा फिरता चषक स्विकारला.
विद्यार्थ्यांचे पासबुक असणारा ड्राय वेस्ट बँक अनुकरणीय उपक्रम
नियमित स्वच्छता कार्य करीत असताना त्यामध्ये ज्या विभागांनी अत्यंत वेगळा उपक्रम राबविला आहे, ज्याचे अनुकरण इतरही विभागात करता येऊ शकते या आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या सूचनेनुसार ड्राय वेस्ट बँक सारख्या बेलापूर विभागात महानगरपालिकेच्या आठही शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाची माहिती सादरीकरणाव्दारे विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच स्वच्छतेची जागरुकता निर्माण करणा-या या अभिनव उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणा-या नमुंमपा शाळा क्र. 3 आग्रोळी गांव ची विद्यार्थिनी रिया कातकरी, नमुंमपा शाळा क्र. 4 सेक्टर 8 सीबीडी बेलापूरचा विद्यार्थी नरेंद्र मुंडावरे आणि नमुंमपा शाळा क्र. 6 करावेगांव ची विद्यार्थिनी अंजली कुमारी शर्मा यांना आयुक्तांच्या शुभहस्ते सन्मानित करून प्रोत्साहित करण्यात आले.
येत्या शैक्षणिक वर्षात ग्रो विथ म्युझिक या अभिनव उपक्रमाव्दारे संगीतातून स्वच्छता संस्कार
याप्रसंगी बोलताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कामामध्ये नाविन्यपूर्णता आणल्याने चैतन्य येते असे सांगत स्वच्छ नवी मुंबईचे ब्रँड ॲबेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संस्कार मुलांच्या कोवळ्या मनात रुजविणा-या ग्रो विथ म्युझिक अर्थात संगीतासोबत विकास हा अभिनव उपक्रम राबविण्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिका शाळांमध्ये सुरुवात करण्यात येईल असे सांगितले. अशाप्रकारचा स्वच्छतेला संगीताशी जोडणारा आगळा वेगळा उपक्रम राबविणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका असेल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.
स्वच्छ सुंदर नवी मुंबईची छायाचित्र स्पर्धा व व्हिडिओ रिल्स स्पर्धा या माध्यमातून प्रतिमा साकारणार
त्याचप्रमाणे सुशोभिकरणामुळे शहराच्या बदललेल्या रुपाची प्रशंसा सर्व स्तरातील नागरिकांकडून तसेच नवी मुंबईला भेटी देणा-या प्रवाशांकडूनही होत असून नवी मुंबईचे हे आकर्षक रूप अनेकजण कॅमे-यांमध्ये छायाचित्रबद्ध करताना दिसतात. अशा छायाचित्रांचे एकत्रित संकलन व्हावे व त्यामधून नवी मुंबईचे सुंदर चित्र उभे रहावे यादृष्टीने स्वच्छ छायाचित्र स्पर्धा तसेच सध्याच्या सोशल मिडीया प्रेमी युगात व्हिडिओ रिल्सना मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता ‘स्वच्छ व्हिडिओ रिल्स स्पर्धा’ आयोजित करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले. या माध्यमातून लोकसहभाग वाढीवर विशेष भर दिला जात असल्याची त्यांनी सांगितले.
स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असून त्याबाबतीत कोणत्याही स्तरावरील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही व कोणावरही कारवाई करण्याची वेळ येऊ नये असे स्पष्ट संकेत यावेळी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अधिकारी, कर्मचारीवृंदाला दिले.
नागरिकांकडून प्राप्त होणा-या स्वच्छतेच्या सूचनांकडे सकारात्मकतेने बघून त्याचे त्वरीत निराकरण करण्याचे आदेश
नवी मुंबईचे नागरिक अत्यंत जागरुक असून त्यांच्याकडून एखाद्या भागातील अस्वच्छतेबाबत छायाचित्रे, संदेश प्राप्त झाल्यास नागरिकांचे शहर स्वच्छतेकडे चांगले लक्ष आहे व शहर स्वच्छ रहावे हा त्यांचा ध्यास आहे हे लक्षात घेत या तक्रारीकडे बघावे व ती तत्परतेने निकाली काढावी असा सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
स्वच्छता विषयक विविध मनोरंजक प्रबोधनपर कार्यक्रमांचे सादरीकरण
याप्रसंगी आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते सफाईमित्रांवरील परिवर्तन या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. कवी रुद्राक्ष पातारे यांच्या स्वच्छ नवी मुबई कवितेला रसिकांनी उत्साही दाद दिली. स्वच्छ समुह नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते सुशिलादेवी देशमुख विद्यालय ऐरोली यांनी स्वच्छतेची साहित्य व साधणे वापरून बहारदार समुह नृत्य सादर केले. नाट्यमय आणि ज्ञानसाधना परिवाराच्या घनकचरा वर्गीकरण विषयक ओलू, सुकू व घातकू या पथनाट्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Published on : 27-01-2023 14:22:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update