उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या हस्ते एनएमएमटी उपक्रमाच्या लोकाभिमुख प्रवासी सेवेचा सन्मान
सदैव तत्पर सुरक्षित सेवा ही ब्रीद वाक्य घेऊन नवी मुंबईची प्रवासी जीवनवाहिनी म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन अर्थात एनएमएमटी उपक्रमास सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, उद्योगमंत्री ना. श्री. उदय सामंत यांच्या सन्माननीय उपस्थितीत 'सकाळ सन्मान' प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांचीही या कार्यक्रमाप्रसंगी विशेष उपस्थिती होती. परिवहन उपक्रमाच्या वतीने परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर यांच्यासह उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता श्री. विवेक अचलकर, मुख्य वाहतुक अधिकारी श्री. अनिल शिंदे यांनी हा मानाचा पुरस्कार स्विकारला.
23 जानेवारी 1996 रोजी स्थापन झालेल्या नमुंमपा परिवहन उपक्रमाने 25 बसेसपासून सुरुवात केली असून आज तब्बल 567 बसेपर्यंत मजल गाठली आहे. 1 लाख 15 हजार 452.6 कि.मी. अंतरापर्यंतच्या साधारणत: 2 कोटी 80 लाख प्रवाशांना सेवा देणारी एनएमएमटी नवी मुंबईसह पनवेल, उरण व रायगड जिल्हा तसेच ठाणे जिल्हा आणि मुंबईचीही प्रवासी वाहिनी झाली आहे.
आयटीएमएस या प्रगत तंत्रप्रणालीच्या आधारे दैनंदिन वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन व नियोजन करून प्रवासीभिमुख वक्तशील व विश्वासार्ह सेवा पुरविण्यात एनएमएमटी आघाड़ीवर आहे. पब्लीक इन्फॉर्मेशन सिस्टीम, जीपीआरएस, ॲटोमॅटीक व्हेईकल लोकेशन सिस्टीम, ॲटोमॅटीक फेअर कलेक्शन सिस्टीम, मोबाईल ॲप, मोबाईल ई टिकेटींग, ओपन लूप, नवी मुंबई स्मार्ट कार्ड अशा अनेक अत्याधुनिक सुविधा प्रवाशांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
आपल्या उत्तम कामगिरीबद्दल नमुंमपा परिवहन उपक्रमास अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले असून नुकताच केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत एनएमएमटीस सर्वोत्तम सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेले शहर म्हणून प्रथम श्रेणीचा पुरस्कार देऊन गोरविण्यात आलेले आहे.
सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान करताना कोव्हिड काळात एनएमएमटीने केलेल्या सेवाभावी कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. लॉकडाऊनमध्येही एनएमएमटी अविश्रांत धावत होती. महानगरपालिकेसह इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, नर्स, डॉक्टर्स, पोलीस, मेडीकल स्टोअर्सचे मालक व कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील घटक या सर्वांना 1887 एनएमएमटी कर्मचा-यांनी कर्तव्य बजावत प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली. कोव्हीड काळात रुग्णवाहिकांची कमतरता भासू लागली तेव्हा 63 एनएमएमटी बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले व कोव्हीडग्रस्तांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
नवी मुंबई शहराच्या पर्यावरणशील विकासासाठी परिवहन उपक्रमाच्या बस ताफ्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रीक बसेसचा वापर सुरु करण्यात आला असून त्या अनुषंगाने चार्जींग स्टेशन उभारण्यात येत आहेत. नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या या सेवाभावी व तत्पर कार्याची दखल घेत सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार परिवहन उपक्रमातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम कामाचे फलीत असून यामध्ये परिवहन उपक्रमाचा वापर करणा-या प्रवासी नागरिकांचाही मोलाचा वाटा असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी एनएमएमटी उपक्रमाशी संबंधीत सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे.
Published on : 30-01-2023 12:12:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update