‘चालता बोलता स्वच्छता’ अभिनव उपक्रमाव्दारे नवी मुंबईतील स्वच्छतेला लोकसहभागातून नवा आयाम

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ओला, सुका व घरगुती घातक अशा 3 प्रकारे कच-याचे निर्मितीच्याच ठिकाणी म्हणजे आपल्या घरातच वर्गीकरण होणे गरजेचे असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच विभागांमध्ये लोकसहभागातून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.
अशाच प्रकारचा स्वच्छतेविषयी सहजपणे जनजागृती करणारा ‘चालता बोलता स्वच्छता’ हा अभिनव उपक्रम कोपरखैरणे विभागात 1 फेब्रुवारीपासून राबविण्यास सुरुपात झाली असून नवी मुंबई महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत रेल्वे स्टेशन, मार्केट, उद्याने, शाळा – महाविद्यालय परिसर अशा वर्दळीच्या ठिकाणी सायं 5 ते 7 या वेळेत महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, कर्मचारी तसेच शेल्टर असोसिएट्सचे प्रतिनिधी असा 6 - 7 जणांचा समूह जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहे. यामध्ये सुरुवातीला जनजागृती करून माहिती दिली जाते तसेच त्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेविषयी सहज सोपे प्रश्न विचारून त्यांना स्वच्छता साहित्य स्वरुपात आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत. अशाच प्रकारे वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेविषयी प्रश्न विचारून योग्य उत्तरे देणा-या नागरिकांनाही बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जात आहे.
‘चालता बोलता स्वच्छता’ हा स्वच्छतेविषयी माहिती देणारा व नागरिकांना प्रोत्साहित करणारा आगळावेगळा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस पडला असून सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तुर्भे विभागाचे स्वच्छता अधिकारी श्री. सुधाकर वडजे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम शेल्टर असोसिएशनच्या सहयोगाने राबविला जात आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे. तुर्भे विभागाचे स्वच्छता निरीक्षक सर्वश्री जयेश पाटील, विजय दुर्लेकर, भूषण पाटील, धनंजय खरे याच्यासह तुर्भे विभागातील स्वच्छता कामांचे सर्व पर्यवेक्षक तसेच शेल्टर असोसिएशनच्या श्रीम. धनश्री गुरव व अमोल गाडे, मंगेश कदम, मनीषा सुर्वे, सोनी भोसले, अश्विनी गायकवाड, मेघा वंजारे आदी सहका-यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने स्वच्छ मंथन या विभाग कार्यालय स्तरावरील स्वच्छता स्पर्धेच्या अनुषंगाने विभाग कार्यालयांमध्ये निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत असून प्रत्येक विभाग कार्यालय अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देत आहे. अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम ‘चालता बोलता स्वच्छता’ हा नागरिकांशी थेट संवाद साधणारा व त्यांना स्वच्छतेविषयी सोपे प्रश्न विचारून त्यांनी योग्य माहिती सांगितल्यानंतर त्यांना बक्षिस देऊन प्रोत्साहित करणारा आहे. यामुळे नवी मुंबईच्या स्वच्छता कार्याला वेगळा आयाम मिळाला आहे.
Published on : 03-02-2023 11:10:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update