‘शून्य कचरा उपक्रम’राबवा आणि सभागृह शुल्कात 25 टक्के सूट मिळवा
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 व महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना, 2018 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेले स्वच्छता विषयक उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरिता तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या वस्तुंचा वापर टाळण्याची सवय लागावी याकरिता माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे व प्लास्टीक वस्तुंचा वापर टाळणे व यामध्ये सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘शून्य कचरा उपक्रम’ राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आपल्या कुटुंबातील कोणताही कार्यक्रम उदा. वाढदिवस, लग्न, मुंज, बारसे किंवा याशिवाय इतर कोणताही सामाजिक / धार्मिक कार्यक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज मंदिर / हॉलमध्ये साजरा करावयाचा असल्यास त्याठिकाणी संबंधितांनी ‘शून्य कचरा उपक्रम’ राबविल्यास महानगरपालिकेमार्फत आकारण्यात येणा-या शुल्कामध्ये 25% इतकी सुट देण्यात येईल. सदर ‘शून्य कचरा उपक्रम’ राबविण्याकरिता खालील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक आहे.
(1) कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीकचा वापर करण्यात येणार नाही.
(2) जेवणाकरिता पर्यावरणपुरक उदा. झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या प्लेट / स्टिलच्या प्लेट / काचेच्या प्लेट / चमच्यांचा (Bio degradable environment friendly) वापर करणे.
(3) पाणी आणि सरबत पिण्याकरिता कागदाच्या (Bio degradable environment friendly drinking cup)/ काचेच्या ग्लासचा वापर करणे.
(4) सजावटीकरिता रंगीत कागदाचा, कापडाचा आणि फ्लेक्स / बॅनर्स करिता कार्डबोर्डचा वापर करणे.
(5) मुलांना रिटर्न गिफ्ट देताना ज्यूट बॅग, रिसायकल पध्दतीने केलेल्या डायऱ्या किंवा स्टिलच्या पाण्याच्या बाटल्या अशा प्रकारच्या वस्तुंचा वापर करणे.
(6) ओला व सूका कचरा टाकण्याकरिता वेगवेगळ्या कचराकुंड्यांचा वापर करणे.
(7) पाण्याचा वापर जपून करणे.
(8) हॉलच्या दर्शनी भागावर स्वच्छतेबाबत जनजागृतीपर संदेश लावणे याकरिता महानगरपालिकेमार्फत सहकार्य करण्यात येईल.
तसेच कार्यक्रम संपल्यानंतर अन्न उरल्यास ते अन्न सेवाभावी संस्थांमार्फत गरीबांना देण्यात यावे.
या ‘शून्य कचरा उपक्रम’ अंतर्गत आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज मंदिर / हॉलमध्ये कोणताही कौटुंबिक अथवा सामाजिक / धार्मिक कार्यक्रम साजरा करु इच्छित असाल तर त्याची नोंदणी स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, तिसरा मजला, भूखंड क्र. 1, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ( दूरध्वनी क्र. 022-27567388 ) येथे करावी अथवा संबंधित विभाग कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 07-02-2023 12:50:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update