दिव्यांग मुलांनी उत्साहात लुटला वार्षिक क्रीडा दिनाचा आनंद
एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगाना सामावून घेणारे देशातील एकमेंव अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी केंद्राचा नावलौकिक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समर्थपणे उभे करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून मनापासून काम केले जात आहे.
यामध्ये दिव्यांगांच्या अंगभूत कला व क्रीडा गुणांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग मुलांना सामान्य मुलांप्रमाणेच खेळाचा आनंद घेता यावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर याच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मुलांच्या वार्षिक क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाच्या निसंर्गरम्य वातावरणात या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये धावणे, सॅक रेस, ससा उडी, बेडूक उडी, सॉफ्ट थ्रो बॉल, गोळा फेक अशा दिव्यांगाना सहजपणे खेळता येतील अशा विविध खेळांचा समावेश होता. या स्पर्धात्मक खेळामध्ये विजयी झालेल्या दिव्यांग खेळाडूंना ईटीसी केंद्राचे विभागप्रमुख तथा उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार तसेच नमुंमपा परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक तथा शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुसकर आणि क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांच्या हस्ते पदकांसह प्रशस्तीपत्र स्वरुपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
सकाळी 8 वाजता मानवंदना देत या दिव्यांग वार्षिक क्रीडा दिनाची उत्साही सुरुवात झाली. यामध्ये ईटीसी केंद्रातील कर्णबधीर, मतीमंद, अंध, बहुविकलांग विद्यार्थ्यांप्रमाणेच बाह्य रुग्ण विभागातील 2 ते 18 वर्ष वयाच्या दिव्यांगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. दिव्यंगत्वामुळे येणा-या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना सहजपणे खेळता येईल व खेळाचा आनंद घेता येईल अशा विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेपेक्षा सहभाग महत्वाचा हे लक्षात घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनीही आपल्या पाल्याप्रमाणेच इतरांनाही प्रोत्साहन देत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
दिव्यांगांकरिता प्रेरणादायी असणा-या या क्रीडा प्रकारांचे नियोजन ईटीसी केंद्रातील शैक्षणिक व्यवस्थापक श्री. दीपक नवगरे आणि श्रीम. स्मिता चौलकर तसेच क्रीडा शिक्षक श्री. सुभाष भुसारा व श्री. समीर म्हात्रे यांनी उत्तम रितीने केले. ईटीसी केंद्रातील सर्व विशेष शिक्षक आणि कर्मचा-यांनी आपल्या विविध जबाबदा-या योग्य रितीने पार पाडत दिव्यांगांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा आनंददायी उपक्रम यशस्वी केला.
Published on : 10-02-2023 12:43:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update