‘जागरुकपालक, सुदृढ बालक’ अभियानांतर्गत 18 वर्षापर्यंतच्या मुलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात




महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बालकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान’ अंतर्गत बालकांच्या आरोग्य तपासणीला 9 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून 12894 बालकांची तपासणी करण्यात आलेली आहे.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले असून पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, शाळा समन्वयक व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दैनंदिन तपासणी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष तपासणी कार्यवाहीला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आलेली असून तपासणी केलेल्या 12894 बालकांपैकी 506 बालकांवर सुयोग्य औषधोपचार करण्यात आलेला आहे.
हे अभियान पुढील आठ आठवडे म्हणजेच 45 ते 48 दिवस हे अभियान राबविले जाणार असून यामध्ये तपासणीअंती आवश्यकता भासल्यास त्या मुलांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. याअभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यापक प्रसिध्दी मोहीम राबविण्यात आली असून बॅनर व होर्डींग प्रमाणेच विभागाविभागात ठिकठिकाणी माइकिंग करण्यात येत आहे.
तरी 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या पालकांनी जागरुक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत आपल्या पाल्याची होणारी आरोग्य तपासणी आवर्जुन करून घ्यावी जेणेकरून त्याला आरोग्यविषयक काही अडचण असल्यास तत्परतेने योग्य उपचार करणे शक्य होईल. म्हणूनच आरोग्यपूर्ण नवी मुंबई शहरासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 13-02-2023 12:28:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update