नवी मुंबई महानगरपालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अथर्व जरंगे खुल्या गटाचा चॅम्पियन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत 400 स्पर्धकांनी सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेत विजेत्या जलतरणपटूंना क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. संतोष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू तथा ठाणे जिल्हा जलतरण असोसिएशनचे सचिव श्री. गोकुळ कामथ व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जलतरणपटू श्रीम. ऋतुजा उदेशी यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नुकत्याच भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये फ्रि रिले मध्ये सुवर्ण, मेडली रिलेमध्ये सुवर्ण व 200 बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकाविणा-या रिषभ दास या नवी मुंबईकर जलतरणपटूचा विशेष सन्मान करण्यात आला.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय, ब्रेस्टस्ट्रोक, फ्री स्टाईल आणि इंन्डिइज्युअल मिडले या 5 जलतरण प्रकारात ही जिल्हास्तरीय स्पर्धा वाशीतील फादर ॲग्नेल शिक्षण संकुलाच्या जलतरण तलावात शनिवार आणि रविवार 2 दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
8 वर्षाखालील मुले व मुली, 10 वर्षाखालील मुले व मुली, 12 वर्षाखालील मुले व मुली, 14 वर्षाखालील मुले व मुली, 16 वर्षाखालील मुले व मुली आणि खुला गट पुरुष व महिला अशा 12 वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेत्या प्रथम 3 क्रमांकाच्या स्पर्धकांना विजेते पदाचे पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रत्येक स्पर्धा प्रकारांतील विजेतेपदाच्या क्रमांकानुसार गुणांकन करण्यात येऊन सर्व स्पर्धा प्रकारातील गुणांचे एकत्रीकरण करून प्रत्येक वयोगटात सर्वाधिक गुण मिळविणा-या जलतरणपटूला त्या गटाच्या चॅम्पियनशिपचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
यामध्ये खुल्या गटात अथर्व जरंगे यांने तसेच 16 वर्षाखालील मुलांच्या गटात रिषभ दास याने त्याचप्रमाणे 14 वर्षाखालील मुलांच्या गटात विहान जेजुरकर तर 14 वर्षाखालील मुलींच्या गटात अहविहा गांधी यांनी चॅम्पियनशिपचा सन्मान स्विकारला. 12 वर्षाखालील मुलांच्या गटात तोशल भिरूड आणि 12 वर्षाखालील मुलीच्या गटात अमिता कुडवा हिने चॅम्पियनशिप पटकाविली. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात रायन सय्यद व मुलींच्या गटात निधी सामंत यांनी तर 8 वर्षाखालील मुलांच्या गटात इवान शाह व मुलींच्या गटात अलिसिया शेट्टी यांनी चॅम्पियनशिपचा चषक संपादन केला.
कोव्हीड कालावधीतील 2 वर्षांनतर या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याने मुलांप्रमाणेच पालकही मोठ्या उत्साहाने आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.
Published on : 13-02-2023 12:35:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update