अधिक आयुर्मान असणा-या जीआय विद्युत खाबांतून नवी मुंबईतील दिवाबत्ती व्यवस्थेचे सक्षमीकरण व सुरक्षा

.jpeg)
.jpeg)

.jpeg)


सिडकोमार्फत 1970 साली विकसित करण्यास सुरुवात झालेल्या नवी मुंबई शहरातील विविध नोडमधील दिवाबत्ती टप्याटप्याने 1998 पासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतरित करण्यात आलेली आहे. तसेच 2005 मध्ये एमआयडीसीमार्फत औद्योगिक क्षेत्रातील दिवाबत्ती व्यवस्थाही महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे.
या हस्तांतरित दिवाबत्तीमध्ये असलेले विद्युत खांब हे एमएस धातुचे असून त्याचे आयुर्मान सीपीडब्ल्युडी च्या निकषानुसार साधारणत: 20 वर्षे आहे. नवी मुंबई शहर हे खाडीकिनारी वसलेले असल्यामुळे येथील रस्त्यांवर सिडको व एमआयडीसीने लावलेले एमएसचे दिवाबत्ती खांब दमट वातावरणामुळे लवकर गंजून खराब होत असल्याचे निदर्शनास येत होते. या अनुषंगाने नागरिक तसेच लोकप्रतिनिधींमार्फतही नवी मुंबई महानगरपालिकेस सदर विद्युत खांब बदलणेबाबत वारंवार सूचना करण्यात येत होत्या.
साधारणत: 2018 पासून यामधील काही एमएसचे गंजलेले पोल पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले व पोल बदलण्यासाठी महानगरपालिकेकडे तसेच शासनाच्या नगरविकास विभागाकडेही सूचना करण्यात आल्या. सन 2020 मधील परिस्थिती बघता 28 ठिकाणी विद्युत खांब पडल्याचे व त्या दुर्घटनेत 5 व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे व अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
या सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून महापालिका प्रशासनामार्फत खराब झालेले व गंजलेले विद्युत खांब बदलण्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन फेब्रुवारी 2020 च्या महासभेत सर्व लोकप्रतिनिधींनीही या विषयाचे गांभीर्य ओळखून प्रस्तावास मान्यता दिली होती.
या प्रस्तावानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या 31 हजार विद्युत खांबांपैकी 5 हजार विद्युत खांब वेळोवेळी विविध कारणांसाठी बदलण्यात आल्यामुळे उर्वरित 17 हजार खराब झालेले विद्युत खांब बदलण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला. या प्रस्तावानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्युत खाबांचे त्रयस्थ पक्षामार्फत पर्यवेक्षण करण्यात आले व त्यामधील खराब झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम सुरु कऱण्यात आले. यामध्ये 17 हजार पैकी साधारणत: 13 हजार इतकेच एमएसचे खराब झालेले विद्युत खांब बदलण्यात आले असून त्याठिकाणी जास्त आयुर्मान असलेले जीआय चे अष्टकोनी विद्युत खांब लावण्यात आलेले आहेत. सीपीडब्ल्युच्या निकषाप्रमाणे त्यांचे आयुर्मान साधारणत: 25 वर्षे नमूद केले आहे.
सदर जीआयचे विद्युत खांब बसविताना या खाबांच्या किंमतीबाबतही सतर्कता राखण्यात आली असून इतर महानगरपालिकांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिकेने कमी किंमतीत हे खांब उपलब्ध करून घेतलेले आहेत.
सिडको व एमआयडीसीमार्फत बसविण्यात आलेले एमएस चे विद्युत खांब हे जमिनीत खड्डा खोदून बसविण्यात आलेले असून ते खराब होण्याचे प्रमाण अधिक होते. नवी मुंबई महानगरपालिकेने नवीन जीआयचे विद्युत खांब बसविताना याची विशेष काळजी घेत सिमेंट काँक्रिटचा चौकोनी पाया बनवून त्यावर मेटल स्क्रूने हे नवीन खांब बसविलेले आहेत.
सदर विद्युत खांब बदलताना केबलसुध्दा बदलणे आवश्यक असून केबल अंडरग्राऊंड असल्यामुळे विविध कामांसाठी रस्ते खोदाई करताना सदर केबल तुटतात आणि नादुरुस्त होतात असेही वेळोवेळी निदर्शनास येत आहे. सदर केबलचे आयुर्मानही साधारणत: 20 वर्षे असल्यामुळे विद्युत खांब बदलुन केबल बदलल्या नसत्या तर सदर यंत्रणा कार्यक्षम राहु शकली नसती. त्यामुळे विद्युत खांब बदलांसोबत केबलही बदलणे अनिवार्य होते.
त्याचप्रमाणे काही ठिकाणी रस्त्यांवर असलेल्या जुन्या विद्युत खाबांमधील अंतर बरेच जास्त असल्याने तसेच काही ठिकाणी खाबांशेजारी असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे प्रकाशास अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता व त्यामुळे वाहतुकीची अडचण होत असल्याच्या तक्रारीही प्राप्त होत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी रस्त्यांवर पुरेशा क्षमतेने (LUX) प्रकाश उपलब्ध होण्यासाठी 2 विद्युत खाबांमधील अंतर कमी करून लावणे आवश्यक होते. याकरिता ज्या रस्त्यांवर नव्या जीआय स्वरुपाचे विद्युत खांब आवश्यक अंतरानुसार लावण्यात येत आहेत. हे करताना कोणत्याही प्रकारे झाडांची हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. याशिवाय त्या ठिकाणचे जुन्या लांब अंतरावर असेलेले काही सुस्थितीत असणारे विद्युत खांब त्या ठिकाणाहून काढून आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात येत आहेत. या प्रक्रियेमध्ये एका ठिकाणाहून काढलेला सुस्थितीतील जीआयचा खांब योग्य ठिकाणी वापरण्यात येईल याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.
हे काम करताना मुख्य रस्त्यांवरील सर्व विद्युत खांब एकाच स्वरुपाचे दिसतील व त्यामुळे शहर सौंदर्यीकरणात भर पडेल याचीही काळजी घेण्यात आलेली आहे.
महत्वाचे म्हणजे हे खांब बदलत असताना जुन्या खांबांचा विभागनिहाय स्थितीमूल्यांकन (Conditional Assessment) अहवाल तयार करण्यात आला असून त्यानुसार आवश्यक अशा ठिकाणीच विद्युत खांब बदलण्याचे काम करण्यात येईल याची दक्षता घेण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेले विद्युत खांब बदलण्याबाबतचे काम हे सिडको व एमआयडीसी कालीन जुने एमएसचे पोल खराब होऊन ते पडल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व त्यामध्ये नागरिकांची कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यादृष्टीने लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने करण्यात येत आहे. ते करतानाही सुस्थितीत असलेला कोणताही विद्युत खांब कारण नसताना बदलला जाणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्यात आलेले आहे.
नवीन प्रकारच्या जीआय च्या अष्टकोनी विद्युत खाबांचे आयुर्मान एमएसच्या खांबापेक्षा अधिक असून नवी मुंबई महानगरपालिकेने ते बसविताना जमिनीत खड्डा खोदून न बसविता त्याच्यासाठी सिमेंट काँक्रिटचा पाया तयार करून बसविलेले असल्याने त्याचे आयुर्मान वाढलेले आहे. या विद्युत खांब बदलात दोन खांबांमध्ये पुरेसे अंतर राखल्यामुळे वाहतुकीला त्याचा लाभ होत असून अष्टकोनी जीआय विद्युत खांबांमुळे नवी मुंबई शहराच्या सौंदर्यातही भर पडलेली आहे.
Published on : 13-02-2023 14:02:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update