मराठी भाषा गौरव दिनी कविवर्य अशोक बागवे नमुंमपा मुख्यालयात करणार मायबोली मराठीचा जागर
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच विविध उपक्रम राबविण्यामध्येही नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या मराठी भाषा विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांची विविध स्तरावर प्रशंसा झाली.
अशाचप्रकारे दि. 27 फेब्रुवारी या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून अर्थात ‘मराठी भाषा गौरव दिन’निमित्त सुप्रसिध्द कवी प्रा. अशोक बागवे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय वास्तुतील ॲम्फीथिएटरमध्ये हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
‘मराठी साहित्यवृक्षाच्या फांदीवर बसलेला गाणारा पक्षी’ असे ज्यांचे वर्णन सुप्रसिध्द संगीतकार यशवंत देव यांनी केले आहे अशा कविवर्य प्रा. अशोक बागवे यांच्या कवितांचे सादरीकरणही यावेळी होणार आहे. मराठी काव्यविश्वात स्वतंत्र नाममुद्रा उमटविणारे आणि मराठी साहित्याचा सर्वांगीण अभ्यास असणारे प्रा. अशोक बागवे यांच्या व्याख्यानाचा आणि कवितांचा विलोभनीय अविष्कार अनुभवण्यासाठी नवी मुंबईकर रसिकांनी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सेक्टर 15 ए. सीबीडी, बेलापूर याठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 24-02-2023 12:46:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update