कोल्हापूरचा ओंकार चौगुले नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा मानकरी




कुस्तीसारख्या मराठी मातीतील रांगड्या खेळाला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करीत असते. मागील दोन वर्षात कोरोना प्रभावामुळे खंडीत झालेली ही परंपरा यावर्षी पुन्हा उत्साहाने राबवत घणसोलीतील महानगरपालिका शाळा क्र.76/105 च्या मैदानावर 25 व 26 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला रसिकांची प्रचंड दाद मिळाली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 74 ते 100 किलो खुल्या गटात ओंकार चौगुले कोल्हापूर यांनी सुरज मुलानी सोलापूर यांच्यावर चुरशीच्या लढतीत मात करीत 1 लाख रुपये रक्कमेच्या पारितोषिकासह मानाचा पट्टा व मानाची गदा पटकाविली.
साता-याच्या सुमित गुजर याने 55 ते 65 किलो वजनी गटात सोलापूरच्या सागर राऊत यांच्यावर अंतिम सामन्यात मात करून नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय कुमार केसरी मानाचा पट्टा व गदा मिळविली.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. सर्जेराव शिंदे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी प्रा. श्रीराम पाटील, डॉ. तपन पाटील, श्री. विकास पाटील, श्री. सतिश म्हात्रे, श्री. अविनाश कदम, श्री. दत्तात्रय दुबे, श्री. युवराज पाटील, श्री. संदिप दळवी, श्री. प्रकाश गोंधळी, श्री. तुकाराम खुटवड आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक विजेत्यांचा सन्मान कऱण्यात आला.
महिलांच्या 55 ते 65 किलो राज्यस्तरीय गटात ठाण्याच्या गौरी जाधव यांनी ठाण्याच्याच साक्षी फुलाटे यांच्यावर मात करीत राज्यस्तरीय महिला गटाचा विजेता चषक स्विकारला.
50 ते 55 किलो महिला कोकण विभागीय कुस्ती स्पर्धेत पायल मरागजे, रायगड तसेच डॉली गुप्ता, मिरा-भाईंदर यांनी अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद पटकाविले.
65 ते 73 किलो राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचे कुस्तीगीर श्री. सोनबा गोंगाणे यांनी कोल्हापूरच्या सौरभ पाटील यांच्यावर मात करीत विजेतेपदाचा बहुमान संपादन केला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रस्तरीय स्पर्धेमध्ये 40 ते 50 किलो वजनी गटात सारंग नरळे यांनी श्लोक पाटील यांच्यावर मात करीत विजेतेपद पटकाविले. तसेच 55 ते 65 किलो वजनी गटात ओंकार पाटील यांनी ओंकार गायकवाड यांचा पराभव करून अंतिम विजेतेपद मिळविले. 60 ते 80 किलो वजनाच्या वजनाच्या गटात साहिल कदम यांनी गौरव भोसले यांच्याकडून पराभव स्विकारत उपविजेते पदावर समाधान मांडले. राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 21 पंचांनी या स्पर्धेचे अत्यंत सुव्यवस्थित परिक्षण केले. या स्पर्धेमध्ये एकूण 4 लाखाहून अधिक रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या 2 दिवसीय कुस्ती स्पर्धेतील थरार दोन्ही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्ती रसिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. फेसबुक व युट्युब लाईव्ह वरूनही क्रीडा रसिकांनी या स्पर्धांचा अनुभव घेत सुनियोजित आयोजनास दाद दिली.
Published on : 27-02-2023 11:47:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update