मनापासून झोकून देऊन काम करणे हे उपायुक्त चाबुकस्वार यांचे वैशिष्ट्य - आयुक्त श्री. राजेश नार्वेकर
श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ कामापुरते काम केले नाही तर नाविन्याचा ध्यास घेऊन सतत वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला व त्यातही दुर्लक्षित घटकांवर विशेष लक्ष देत तळमळीने काम केले असा उल्लेख करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या कारकिर्दीचा सेवानिवृत्त समारंभ प्रसंगी गौरव केला. कोणत्याही कर्मचा-याने प्रामाणिकपणे काम केले तर त्या संस्थेचाच गौरव वाढतो आणि श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी तशा प्रकारचे संस्थात्मक काम केले असल्याचे आयुक्तांनी विशेषत्वाने सांगितले.
उपआयुक्त पदावरून विहिती वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह प्राथमिक शिक्षिका श्रीम. यशोदा बोडके, वरिष्ठ लिपिक श्री. प्रकाश बागडे, वाहन चालक श्री. किशोर गोतारणे, शस्त्रक्रियागृह सहाय्यक श्री. शाम बहादुर मौर्य, आया श्रीम. सुप्रिया शेलार अशा 6 अधिकारी, कर्मचारीवृंदास सेवानिवृत्तीनिमित्त महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची व कोणतेही काम पुढाकार घेऊन हसतमुखाने पार पाडण्याची कार्यपध्दती असल्यामुळेच श्री. दादासाहेब चाबुकस्वार हे उत्तम काम करू शकले असे मत व्यक्त केले.
शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्ये सांगत न थकता अहोरात्र काम कऱण्याची क्षमता असणारा अधिकारी अशा शब्दात त्यांच्या कामाची प्रशंसा केली. कोणत्याही कामाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच हाती घेतलेल्या कामात यश लाभल्याचे ते म्हणाले.
परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांनी श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांची कार्यपध्दती ही लोकांशी सतत संपर्क ठेवून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याची असल्याने अनेक विभागात त्यांनी काम केले असले तरी त्यांच्या कामाचा सर्वाधिक ठसा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय घटक अशा समाज घटकांना न्याय मिळवून देणा-या समाजविकास विभागावरच उमटला असल्याचे निरीक्षण नोंदविले.
उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी सेवानिवृत्त होणा-या सर्व अधिकारी, कर्मचा-यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना नवी मुंबई महानगरपालिकेला आई मानतो. त्यामुळे तिच्या नावलौकीकासाठी आपल्या परीने जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे केल्याचे सांगत काम करताना नेहमी संस्थेचे हित जपण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांवर काम करताना देतील ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. या कामी तत्कालीन आयुक्त तसेच वरिष्ठ अधिका-यांसह सहकारी कर्मचा-यांनीही मोलाची साथ दिली असे नमूद करीत या सत्काराने भारावून गेलो असल्याचे सांगितले. महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये संपन्न झालेल्या या सेवानिवृत्ती समारंभाप्रसंगी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 01-03-2023 12:44:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update