शहर स्वच्छतेत सुधारणांच्या अपेक्षा पूर्ततेसाठी कृतीशील होण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश

नवी मुंबई शहराची प्रतिमा नागरिकांच्या मनात स्वच्छ शहर म्हणून ठसलेली असल्याने शहर स्वच्छतेबाबत आणखी सुधारणांची अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने क्षेत्रीय कर्मचा-यांपासून ज्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी आहे अशा नोडल अधिका-यांपर्यंत सर्वांनी आपण करीत असलेले काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छतेच्या दर्जात कोणत्याही प्रकारे ढिसाळपणा चालणार नाही असे स्पष्ट संकेत दिले.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जाताना स्वच्छतेशी संबंधीत सर्वच बाबींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असून कचरा वर्गीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आयुक्तांनी कचरा वर्गीकरणाचा विभागनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशित केले. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो अशा सोसायट्यांनी आपल्या आवारातच ओल्या कच-याचे प्रक्रिया प्रकल्प राबविणे बंधनकारक असून त्यादृष्टीने सर्व विभागाच्या विभाग अधिकारी यांनी संबंधीत स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्यासह आढावा घेऊन प्रत्येक मोठी सोसायटी याची अंमलबजावणी करेल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. गावठाण व झोपडपट्टी भागातील कचरा वर्गीकरणावरही स्थानिक अडचणी लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणच्या संबंधित अधिका-यांनी त्यावर उपाययोजना अंमलात आणाव्यात अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
सर्वच विभागांमध्ये एकल प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून दंडात्मक रक्कम वसूल केली जात आहे. तथापी दंड वसूल करणे हे आपले उद्दीष्ट नसून एकल प्लास्टिक वापरात येताच कामा नये यादृष्टीने कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी सूचित केले. ज्या ठिकाणाहून प्लास्टिकच्या पिशव्या व एकल प्लास्टिक साठा करून वितरीत केले जाते त्या विरोधात धडक मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यादृष्टीने एपीएमसी मार्केट परिसरात अधिक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. होळीच्या सणामध्ये फुग्यांच्या ऐवजी मोठ्या प्रमाणावर पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन त्यादृष्टीने विभाग कार्यालय स्तरीय यंत्रणेने आत्तापासूनच सतर्क रहावे अशाही सूचना आयुक्तांनी याप्रसंगी दिल्या.
शौचालय स्वच्छता ही एक प्रमुख जबाबादारी असून प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाने आपल्या कार्यक्षेत्रातील शौचालय सफाईची दररोज तपासणी करावी व त्याचा अहवाल विभाग अधिकारी यांचेकडे द्यावा व त्यावर नोडल अधिकारी यांनी बारकाईने लक्ष द्यावे असेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी निर्देशित केले.
व्यापारी क्षेत्रातील रस्ते सफाई सकाळ प्रमाणेच रात्रीही होत असते. ही रात्रीची सफाई योग्य रितीने होत असल्याचे पर्यवेक्षण केले जावे व महानगरपालिकेने रस्ते सफाई केल्यानंतर रस्त्यावर कचरा टाकणा-या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. विशेषत्वाने खाद्य पदार्थांच्या विक्रेत्या दुकनदारांनी आपल्या कडील कचरा योग्य रितीने वर्गीकृत केला जाईल व त्याचे संकलन योग्य प्रकारे होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
कंत्राटदारांमार्फत सफाई कामगारांना दिले जाणारे स्वच्छता सुरक्षा साहित्य योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात दिले जात असल्याबद्दलची खातरजमा नोडल अधिकारी यांनी करून घ्यावी. रस्त्यावर लावण्यात आलेल्या ज्या लीटर बीन्स मोडकळीस आलेल्या आहेत अथवा खराब झालेल्या आहेत अशा ठिकाणच्या लीटर बीन्स त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात अथवा दुरुस्त करणे शक्य नसल्यास वा चोरीला गेलेल्या असल्यास नवीन बसवाव्यात अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
अनेक दुकानदार आपल्या दुकानांजवळ ओला व सुक्या कच-यासाठी 2 वेगवेगळे कच-याचे डबे ठेवताना दिसून येत नाहीत हे अधोरेखीत करीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी तशा प्रकारच्या कडक सूचना दुकानदारांना देण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. दुभाजकातील स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये असे स्पष्ट करीत आयुक्तांनी सी ॲण्ड डी वेस्ट बाबतचे धोरण अद्ययावत करण्याचे निर्देशित केले. पावसाळापूर्वीची नाले सफाईची कामे विहित वेळेत सुरु होतील याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
स्वच्छतेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या पुढे जात ती वाढविण्यासाठी आपण एक पाऊल पुढे गेले पाहिजे असे निर्देशित करीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपण स्वत: विभागवार प्रत्यक्ष पाहणी दौरे करणार असल्याचे सांगितले. आयुक्तांच्या स्वत: पाहणी दौरे करणार असल्याने स्वच्छ सर्वेक्षण विषयक कामांना गती येणार आहे.
Published on : 02-03-2023 11:31:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update