नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या विविध भागातील पाहणी दौ-यांमुळे स्वच्छता कार्याला गती
नवी मुंबई शहरातील स्वच्छतेची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी व त्यामध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी क्षेत्रीय स्वच्छता पाहणी दौ-यांना सुरुवात केली असून आज त्यांनी नेरुळ शिरवणे भाग, वाशी, कोपरखैरणे अंतर्गत भागांसह एमआयडीसी क्षेत्र व इंदिरा नगर तुर्भे भागातील स्वच्छतेची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, नोडल अधिकारी उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर यांच्यासह केलेल्या या पाहणी दौ-यात आयुक्तांनी ठिकठिकाणी थांबत कचरा संकलन व वाहतुक पद्धतीचाही आढावा घेत मौल्यवान सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिका आपल्या परीने शहर स्वच्छ राखण्यासाठी नियोजन करीत आहे. मात्र त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही तर 100 टक्के शहर स्वच्छता होण्यात अडथळे निर्माण होतील. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून घरातील कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करावा तसेच तो महानगरपालिकेच्या कचरा संकलनाच्या वेळेत कचरा गाड्यांमध्येच द्यावा असे पुन्हा एकवार आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
या पाहणी दौ-यात 7 ते 8 ठिकाणी थांबत आयुक्तांनी कचरा गाड्यांव्दारे होत असलेल्या कचरा संकलन प्रक्रियेची पाहणी केली. सद्यस्थितीत कचरा संकलनासाठी 77 रिफ्युज कॉम्पॅक्टर सारख्या मोठ्या गाड्या तसेच लहान गल्यांमध्ये जाण्यासाठी 72 मिनी टिप्पर सारख्या छोट्या गाड्या वापरात आहेत. या गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वाहून नेण्यासाठी स्वतंत्र कप्पे असून त्यामध्ये योग्य प्रकारे ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवला जात आहे काय याचीही पाहणी आयुक्तांनी बारकाईने केली. याशिवाय टिप्परमध्ये घरगुती घातक कचरा, ई कचरा असेही स्वतंत्र कप्पे असून त्यामध्येही तशाच प्रकारचा कचरा ठेवला जात असल्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करून घेतली.
मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या क़डेला मोठ्या प्रमाणावर गाड्या पार्किंग करून ठेवल्या जात असल्याने सकाळी 6 पासून सुरु होणा-या रस्ते स्वच्छता कामात या गाड्यांचा अडथळा होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गॅरेजेस आहेत त्या रस्त्यांच्या पदपथावरही दुचाकी वाहने पार्किंग करून ठेवली जात असल्याने स्वच्छता कामात अडचण निर्माण होते. याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व विभाग अधिकारी यांना निर्गमित करण्यास सांगितले व याबाबतचा अहवाल त्वरित आपल्याकडे सादर करावा असेही सूचित करण्यात आले.
विविध भागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची पाहणी करताना सकाळच्या सत्रात नागरिकांची वर्दळ असल्याने त्याकाळात स्वच्छतेकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी तेथील पर्यवेक्षकांना तसेच त्यांच्यावर लक्ष देणा-या स्वच्छता निरीक्षकांना दिले. स्वच्छता निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील सर्व स्वच्छतागृहांची दररोज एक फेरी मारून पाहणी करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. महिलांच्या स्वच्छतागृहात लावलेल्या वेंडींग मशीनमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिडको, एमआयडीसी, रेल्वे अशा विविध प्राधिकरणांचे भूखंड व जागा असून तेथील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज लक्षात घेऊन सर्व प्राधिकरणांची संयुक्त बैठक त्वरित आयोजित करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्तांना दिले.
‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ ही झोपडपट्टी भागातील कचरा संकलनासाठी अत्यंत प्रभावी ठरलेली उपाययोजना असून प्रायोगिक तत्वावर सुरु असलेल्या 5 मॉडेलपैकी इंदिरानगर तुर्भे भागातील प्रकल्पस्थळाला भेट देत आयुक्तांनी झोपडपट्टीतील गल्लोगल्ली जाऊन कचरा संकलन पध्दती, वेगवेगळ्या डब्यात गोळा झालेला कचरा विशिष्ट प्रकल्प ठिकाणी आणून त्यामधील ओल्या कच-यावर कंपोस्टींग प्रक्रिया, त्याचे 28 ते 30 दिवसांनंतर खतात रुपांतर झाल्यानंतर ते सुकवून पॅकिंग करण्याची पध्दती या सर्व प्रणालीची आयुक्तांनी पाहणी केली. तसेच तेथील कचरा वेचक महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून संपूर्ण प्रणाली जाणून घेतली. आयुक्त स्वत: त्यांच्या समवेत इंदिरानगर झोपडपट्टीतील एका भागात गेले व त्याठिकाणी होणा-या कचरा संकलन प्रक्रियेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
नवी मुंबई शहर हे विकसित नागरी भाग, गावठाण व झोपडपट्टी अशा 3 प्रकारच्या वस्तीने सामावलेले असून तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने कचरा संकलन प्रक्रिया राबविणे आवश्यक ठरते. या प्रक्रियेत सुधारणा आणून कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचे नियोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्याचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी निश्चित केले आहे.
Published on : 03-03-2023 12:08:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update