फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत दिवागाव संघ ग्रामीण आणि युनाईटेड ऐरोली संघ शहरी भागातील नमुंमपा चषकाचा विजेता

वयाच्या चाळीशी नंतर क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून आरोग्याविषयी जागरुकता दाखविणा-या खेळाडूंनी एकत्र येत 2005 साली मास्टर प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून फोर्टी प्लस क्रिकेट ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून नवी मुंबई महानगरपालिकेनेही फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे.
मागील दोन वर्षाचा कोरोना प्रभावीत कालखंड वगळता सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. दिनांक 3 व 4 मार्च रोजी सेक्टर 16, घणसोली येथील फोर्टी प्लस क्रीडांगणात आयोजित या नवी मुंबई महानगरपालिका फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धमध्ये दिवागाव फोर्टी प्लस संघाने ग्रामीण विभागाच्या स्पर्धेत तसेच युनायटेड ऐरोली या फोर्टी प्लस संघाने शहरी विभागाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करीत विजेतेपद संपादन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा व सांस्कृतीक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, फोर्टी प्ल्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, उपाध्यक्ष श्री राणा, सचिव श्री लीलाधर पाटील व श्री विकास मोकल, माजी नगरसेवक श्री जी एस पाटील, श्री सीताराम मढवी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते विजेत्यांना सन्मानीत करण्यात आले.
या वेळी फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातून सहभागी 32 संघातून दिवागाव फोर्टी प्लस संघाने सर्वात उत्तम कामगिरी करीत विजेतपद आणि गोठिवली गाव फोर्टी प्लस संघाने उपविजेतेपद पटकाविले. तळवलीगाव फोर्टी प्लस संघ आणि नेरुळ गाव फोर्टी प्लस संघ तृतीय क्रमांकाचे विभागून मानकरी ठरले. विजेत्या संघाना चषक प्रदान करण्यात आले तसेच चारही संघातील सर्व 12 खेळाडूंना पदके प्रदान करण्यात आली.
अशाच प्रकारे फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेमध्ये शहरी विभागातून सहभागी 21 संघांतून युनायटेड ऐरोली फोर्टी प्लस संघाने विजेतेपदाचा चषक पटकाविला त्यांनी सत्यमेव ऐरोली या संघावर अंतिम सामन्यात मात केल्याने सत्यमेव यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सीबीडी बेलापूर फोर्टी प्लस संघ आणि खैरणे बोनकोडे फोर्टी प्लस संघ विभागून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या सर्व संघाना चषक तसेच संघातील 12 खेळाडूंना पदके प्रदान करण्यात आली.
स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये दिवागाव फोर्टी प्लस संघाचे श्री. किशोर पाटील हे ग्रामीण भागाच्या स्पर्धेत तसेच युनाईटेड ऐरोली फोर्टी प्लस संघाचे श्री. राम पोळ शहर भागाच्या स्पर्धेचे मालिकावीर ठरले.
उत्कृष्ट फलंदाज म्हणून गोठिवलीगाव फोर्टी प्लस संघाचे श्री.सुनील पवार यांनी तसेच सीबीडी बेलापूर फोर्टी प्लस संघाचे श्री. संजीव परब यांनी पारितोषिके पटकाविली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तळवलीगाव फोर्टी प्लस संघाचे श्री. योगेश पाटील तसेच सत्यमेव ऐरोली संघाचे श्री. महेश पवार यांनी पारितोषिके स्विकारली. नेरूळगाव फोर्टी प्लस संघाचे श्री. महादेव म्हात्रे यांनी तसेच खैरणे फोर्टी प्लस संघाचे श्री. कामील पटेल यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची पारितोषिके संपादन केली.
नवी मुंबईत 19 वर्षांपूर्वी सुरू झालेली फोर्टी प्लस क्रिकेटची सकल्पना आता सर्वदूर पसरू लागलेली असून चाळीशीनंतरचे हे क्रिकेट शारीरिक तंदुरूस्तीसाठी लाभदायक ठरत आहे.
Published on : 06-03-2023 12:31:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update