नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेला नवी मुंबईसह पुणे व नाशिक केंद्रावर उत्साहात सुरुवात

.jpeg)

.jpeg)


.jpeg)
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांच्या स्पर्धा आयोजनातून नवी मुंबईकर क्रीडापटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामध्ये अग्रेसर आहे. त्या सोबतीनेच येथील कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
अशाच प्रकारची नाट्यकला गुणांना उत्तेजन देणारी 'नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा 2022-23' आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालनाट्य संस्थांना स्वतंत्र पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 8 मार्च 2023 रोजी अत्यंत उत्साहात सुरुवात झाली असून नवी मुंबई सह ठाणे जिल्हा, रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव, अमरावती अशा महाराष्ट्राच्या विविध भागांमधून 35 बालनाट्य संस्थांनी स्पर्धा सहभाग नोंदविला आहे.
या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील केंद्रासह नाशिक येथील भगवंतनगर समाज मंदिर, मुंबई नाका, नाशिक येथील केंद्रावर तसेच पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरी निघोजकर मंगल कार्यालय, नारायण पेठ, पुणे येथे 8 व 9 मार्च रोजी संपन्न होत आहे.
नवी मुंबई केंद्रावर अनिकेत पाटील आणि विनोद गायकर तसेच नाशिक व पुणे केंद्रावरील बालनाट्याच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण प्रशांत विचारे हे बालनाट्य क्षेत्रातील मान्यवर करीत आहेत.
प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट 15 बालनाट्य संस्थांची निवड केली जाईल व त्यांची अंतिम फेरी 13 मार्च व 14 मार्च 2023 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी 10 वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेली आहे.
दि. 14 मार्च 2023 रोजी नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सायं. 6 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न होणार आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेली 15 सर्वोत्तम बालनाट्ये दि. 13 व 14 मार्च रोजी पाहण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे मोफत प्रवेशिका दि.10 मार्चपासून उपलब्ध करून ठेवण्यात येत आहेत.
तरी नवी मुंबईकर बालकलावंतानी तसेच नाट्यरसिकांनी आपली कला प्रदर्शित करण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या बालकलावंतांचे तसेच नवी मुंबईच्या नाट्यसंस्थांमधील बालकलावंतांचे कौतुक करण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-03-2023 11:19:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update