आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या प्रत्यक्ष पाहणी दौ-यांमुळे स्वच्छतेत दिसू लागली अधिक सुधारणा




महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विभागाविभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्वच्छता पाहणी दौरे सुरु केले असून मागील आठवडाभरात क्षेत्रीय पातळीवर स्वच्छतेविषयी अधिक सकारात्मक चित्र दिसून येत असल्याचे अभिप्राय नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. आजही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत बेलापूर विभागातील स्वच्छता कामांची बारकाईने पाहणी केली व ठिकठिकाणी थांबून स्वच्छतेविषयी मौलीक सूचना केल्या.
गणपतशेठ तांडेल मैदानाच्या कॉर्नरला मातीचे ढिगारे दिसून आल्याने आयुक्तांनी संबंधीत अधिका-यांना फैलावर घेत डेब्रीज भरारी पथके अधिक कृतीशील करण्याचे निर्देश दिले. अज्ञात व्यक्तींकडून अशाप्रकारे मोकळ्या जागी अथवा मोकळ्या भूखंडांवर डेब्रीज टाकले जात असल्याने शहर स्वच्छतेला बाधा पोहचत असून याबाबत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सूचित केले व डेब्रीज भरारी पथकाच्या प्रमुखांकडून खुलासा मागविण्याचे तसेच कारवाई करण्याचे निर्देशित केले. यापुढील काळात अशाप्रकारे डेब्रीज टाकलेले आढळल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल असेही स्पष्ट संकेत आयुक्तांनी यावेळी दिले.
नवी मुंबईत विशिष्ट स्थळांवर मॉर्नींग वॉकला येणा-या नागरिकांचे प्रमाण अधिक असून अशा मार्गांची सफाई अधिक लवकर सुरु करावी व प्राधान्याने लोक चालायला येण्यापू्र्वी पूर्ण करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
सध्या पानगळीचा कालावधी असल्याने झाडांच्या पानांचा व छोट्या फांद्यांचा हरित कचरा हा रस्त्यांच्या कडेला व पदपथावर पडण्याचे प्रमाणही अधिक असल्याने तो हरित कचरा उचलण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यासाठी काही दिवसांकरिता ते विशिष्ट काम करण्यासाठी पथके नेमावीत असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
दिवाळेगांव येथील मासळी मार्केटची तसेच आतमधील फिशफेड प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्याची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच त्या परिसरातील इतर नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर सुरु करावीत असेही आयुक्तांनी कार्यकारी अभियंता श्री. अऱविंद शिंदे यांना निर्देश दिले. त्याठिकाणच्या नवीन मार्केटबाहेर असणा-या मासळी विक्रेत्यांकरिता मार्केट बांधण्याची सुरु असलेली कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी अशाही सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. दिवाळेगांव जेट्टी तसेच त्या परिसरातील शौचालयांचीही पाहणी करून तेथील स्वच्छता व निगा अधिक चांगल्या प्रकारे राखण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
विविध भागांना भेटी देत असताना काही शौचालयांच्या ठिकाणी थांबून आयुक्तांनी तेथील स्वच्छतेची पाहणी केली तसेच त्याठिकाणी नागरिकांसाठी स्वच्छता साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत काय याचीही बारकाईने पाहणी केली. वर्दळीच्या वेळी नियमितपणे शौचालये स्वच्छ राहतील याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. स्थानिक स्वच्छता निरीक्षकाने व स्वच्छता अधिका-यांनी शौचालयांच्या स्वच्छतेकडे नियमितपणे काटेकोर लक्ष द्यावे असेही स्पष्ट निर्देश आयुक्तानी दिले.
बेलापूर व नेरुळ भागात मुख्य रस्त्यांवर पाहणी करताना ब-याच ठिकाणी रस्त्यांवरून कल्व्हर्टमध्ये पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी रस्ते व पदपथाच्या कॉर्नरवर ठेवलेल्या वर्तुळाकार जागेवरील जाळ्यांवर माती जमा झाल्याने पाणी वाहून जाण्यास होणारा अडथळा लक्षात घेऊन ते मार्ग साफ करावेत असेही आयुक्तांनी सूचित केले.
या पाहणी दौ-यात आयुक्तांनी सीवूड रेल्वे ब्रीज, सेक्टर 40, 42, करावे, गणपतशेठ तांडेल मैदान, ज्वेल ऑफ नवी मुंबई, झोटींगदेव मैदान, सेक्टर 44, पामबीच मार्ग, दिवाळेगांव, सेक्टर 11, सेक्टर 15, कोकण भवन व आसपासचा शासकीय कार्यालय परिसर, आर्टिस्ट व्हिलेज, रमाबाई आंबेडकर नगर, सेक्टर 14 अशा विविध ठिकाणी भेटी देत स्वच्छता स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
शहर स्वच्छतेत काही प्रमाणात सुधारणा दिसत असली तरी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे आपले ध्येय असल्याने आणि स्वच्छता ही नियमित करण्याची व त्यामध्ये सतत सुधारणा करण्याची बाब असल्याने अधिक चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नागरिकांनीही शहर स्वच्छतेबाबतचे आपले कर्तव्य पार पाडून शहराला नंबर वन बनविण्यासाठी अधिक जोमाने सहयोग द्यावा असे आवाहन केले आहे.
Published on : 10-03-2023 13:10:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update