अडीचशेहून अधिक सायकलपटूंनी यशस्वीपणे प्रसारित केला माझी वसुंधरा अभियानाचा पर्यावरणपूरक संदेश
स्वच्छतेसोबतच पर्यावरणविषयी अत्यंत जागरूक असणा-या नागरिकांमुळेच नवी मुंबई स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरण रक्षण, संवर्धनातही राज्यात नेहमीच आघाडीवर राहिली असून माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित सायक्लोथॉनला अडीडशेहून अधिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जो उत्साही प्रतिसाद दिला या सक्रिय सहभागाचे कौतुक करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ देत सायक्लोथ़ॉन 2023 चा शुभारंभ केला.
माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आणि सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायक्लोथॉन 2023 ला हिरवा झेंडा दाखवित आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सायक्लोथॉनचा शुभारंभ केला आणि सहभागी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा नमुंमपा माझी वसुंधरा अभियानच्या नोडल अधिकारी श्रीम. सुजाता ढोले. क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त ड़ॉ. बाबासाहेब राजळे, परवाना विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, सायकलिस्ट क्लब ऑफ इंडियाचे प्रमुख श्री. जय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या माझी वसुंधरा अभियानात नवी मुंबई हे राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर असून यावर्षीही प्रथम क्रमांक कायम राखण्याचा निर्धार करीत व्यापक लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणूच सायक्लोथॉनसारख्या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मोराज सर्कल ते नमुंमपा मुख्यालयापर्यंतच्या साधारणत: 8 किमी अंतराच्या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत हे अंतर पार करणा-या सायकलपटूंना मुख्यालयाठिकाणी प्रशस्तिपत्रे प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. यामध्ये हर्ष विजय जाधव हा अवघा 4 वर्षांचा मुलगा विशेष आकर्षण ठरला. वय वर्षे 4 ते वयाची साठी पार करणा-या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी सायक्लोथॉनमध्ये उत्साही सहभाग घेत हा पर्यावरणशील उपक्रम यशस्वी केला.
सायकलसारख्या प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक वाहनाचा अवलंब करणा-या व इतरांनीही तसे करावे म्हणून सायक्लोथॉनच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा व वसुंधरेच्या संवर्धनाचा संदेश देणा-या सहभागी सायकलपटूंची अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी प्रशस्तिपत्रे वितरित करताना प्रशंसा केली. युलू जन सायकल सहभाग प्रणालीला नवी मुंबईकर नागरिकांकडून जो प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे नवी मुंबई हे देशातील अग्रणी सायकलप्रेमी शहर म्हणून नावाजले जात असल्याचा विशेष उल्लेख याठिकाणी करण्यात आला.
प्रवास करण्यासाठी हरित पर्यायांचा विचार करण्याची व शहरात हरित मार्ग निर्माण करण्यासाठी कटिबध्द असणा-या नागरिकांमुळेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात आलेला सायक्लोथॉन उपक्रम यशस्वी झाला.
Published on : 12-03-2023 07:57:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update